घन:शाम कुंभार - यड्राव-- खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे किरकोळ कारणावरून युवकाचा झालेला खून, तसेच ग्रामस्थांनीच हल्लेखोरास पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे. यामुळे अवैद्य कृत्य करणाऱ्यांना कायद्याचे भय नसल्याचे धोतक आहे. यड्राव परिसर हा शहापूर पोलीस ठाण्याअंतर्गत समाविष्ट असल्याने असे कृत्य करणाऱ्यांना जरब बसविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांशी संवाद व अवैद्य कृत्य करणाऱ्यांना धाक दाखविण्याची वेळ शहापूर पोलीस ठाण्यावर आली आहे. यावरच परिसराची शांतता व सुरक्षितता अवलंबून आहे. मोबाईलवरील अश्लील मॅसेज प्रतिबंध करण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.यड्राव पार्वती औद्योगिक वसाहत, शहापूरची लोटस पार्क, तारदाळची प्राईड इंडिया या औद्योगिक वसाहती व परिसरामध्ये उद्योगाचे जाळे पसरले आहे. यामध्ये पुरुषांबरोबर महिला कामगारांचा मोठा सहभाग आहे. या औद्योगिकीरणामुळे कामगार वर्ग मोठा आहे. चांगला पगार यामुळे शिक्षण सोडून काम करण्याकडे युवा वर्गाचा कल आहे. त्यामुळे अशिक्षितपणा व चांगल्या वाईटाचा अजाणतेपणा दिसून येतो. कमी वयात पैसे हातात आल्याने चैनी करण्याकडे कल, त्यातून व्यसन, स्मार्टफोन, अनैतिकपणा जोर धरत आहे. सध्या स्मार्टफोनवरून व्हॉटस्अॅप मेसेजची फार मोठी गडबड झाली आहे. कोणताही मेसेज अथवा फोटो क्षणात पाठविता येत आहे; परंतु लहान वय अज्ञानपणा अश्लीलतेविषयी आवड असणाऱ्या सवयीमुळे चुकीचे फोटो व मेसेज पाठविण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातून गैरसमज, वादविवाद, हाणामारी यासारखे प्रकार घडत आहेत.वादावादी, मारामारी याला फक्त हेच कारण असते असे नसलेतरी मागील वाद यास कारणीभूत ठरतो. अशाच प्रकारातून खोतवाडी येथे युवकास बळी जावे लागले. हल्लेखोरही त्याच वयाचा, परंतु वैचारीकपणाच्या अभावामुळे हा प्रसंग उद्भवला.समाजातील वाईट कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक नसल्याने असे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी अवैद्य कृत्य करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तसेच सर्वसामान्यांसाठी पोलिसांबरोबर विश्वासार्हता वाढविण्यासाठी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. यामुळेच पोलिसांना शांतता व सुरक्षितता राखणे सोपे जाणार आहे. (पूर्वार्ध)
गुन्हेगारांवर धाकासाठी ठोस कृतीची गरज
By admin | Published: January 07, 2015 9:03 PM