कोल्हापूर : भारत शांतताप्रिय देश आहे, हे खरे; मात्र घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा परखड शब्दांत चीनला इशारा देण्याचीही गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘भारत-चीन संबंध’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषण करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.डॉ. थोरात म्हणाले, चीन व पाकिस्तान हे केवळ आंतरराष्ट्रीय सहकारी नाहीत, तर मित्र आहेत. त्यांच्या आपापल्या महत्त्वाकांक्षा आहेत. चीनच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा तर प्रचंड आसुरी आहेत. भारतीय नियंत्रण रेषा उल्लंघून आत शिरण्यासाठी ते सातत्याने संधींच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांना सज्जड इशारा देण्याची आवश्यकता आहे.चीन युद्दातील पराभव परराष्ट्र धोरणाचे अपयश१९६२च्या भारत-चीन युद्धातील पराभव आपल्याला आजही झोंबणारा आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांकडे शौर्य व धैर्याची कमतरता नव्हती. मात्र शस्त्रसामग्री व साधनांची कमतरता निश्चित होती. लोकशाहीत लष्कर हे एक साधन असते. त्याकडे १९५० ते १९६२ या काळात आपले अक्षम्य दुर्लक्ष्य झाले. त्यावेळी आपले अपयश युद्धातील नव्हते, तर ते आपल्या देशाचे आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचे अपयश होते.
घुसखोरीवरुन चीनला परखड इशारा देण्याची गरज : डॉ. यशवंतराव थोरात
By पोपट केशव पवार | Published: December 20, 2023 3:44 PM