लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे शस्त्र वापरून बदल आणि परिवर्तनाबद्दल गोंधळ निर्माण केला. शालेय शिक्षणापासूनच हिंदुत्वाच्या उतरंडीचे विष पेरले जात आहे. प्रश्न विचारणारा थेट देशद्रोही ठरविण्यात आला. अशा वातावरणात मूल्यभान असलेल्या परिवर्तनवादी विचारांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी मंगळवारी व्यक्त केले. येथील भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांना ‘भाई माधवराव बागल पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराल उत्तर देताना त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पुष्पा भावे म्हणाल्या, ‘उजव्या दृष्टिकोनाच्या या सरकारने राजकारणासाठी भाषेचा गोड वापर केला. गांधीवधापासून त्याची सुरुवात झाली आणि आता ‘मन की बात’ सुरू आहे. दुसऱ्यावर टीका करीत स्वत: केलेल्या पापांवर पांघरूण घातले गेले. गुजरातमधील बलात्कार, अन्याय, दंगली, प्रतिष्ठेसाठी खून हा त्यांचा इतिहास आहे. आम्ही देशप्रेमी आणि विरोधात बोललेला देशद्रोही, त्याचा थेट शिरच्छेदच करा, असे आदेश दिले जात आहेत. मी उच्च आणि तो डागाळलेला या वंशीय जातीय व्यवस्था पक्क्या केल्या जात आहेत. या असहिष्णूतेच्या विरोधात कलाकारांनी पुरस्कार परत केले तर त्यांची कुचेष्टा करण्यात आली. ‘एफटीआय’सारख्या शिक्षणाच्या उच्चतम जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. या परिस्थितीत परिवर्तनाचा विचार आणि कृती कार्यक्रम करण्याची आणि हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.’बारसं स्पेशालिस्ट भावे म्हणाल्या, हे सरकार ‘बारसं स्पेशालिस्ट’ आहे. जुन्या योजनांना नवीन नाव दिले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची दुर्दशा होत असताना दुसरीकडे त्यांच्याभोवती ‘अच्छे दिन’चे आभास निर्माण केले आहे.
परिवर्तनवादी विचारांच्या हस्तक्षेपाची गरज
By admin | Published: May 31, 2017 3:39 AM