कोल्हापूर : भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाहण्याची व त्यातून आपणच बोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी येथे केले.राम गणेश गडकरी हॉलमध्ये दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सी. जी. कुलकर्णी वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी ‘भारतीय सिनेमा आणि जागतिक सिनेमा’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया होते.राणे म्हणाले, हिंदी सिनेमा ही अभ्यास करण्याची गोष्ट आहे. त्याचा शास्त्रोक्त विचार व्हायला हवा. सिनेमाकडे पाहण्याची, रसिकांच्या दृष्टीने मनोरंजनाची विशिष्ट चौकट आहे. माणसाचं वय वाढत जातं तशी त्याच्यामध्ये प्रगल्भता येते, अभिरुची बदलते असं आपण मानतो; पण असं होत नाही. आपलं वय वाढतं, त्यासोबत समज वाढत नाही. आपण इतके सुमार दर्जाचे चित्रपट पाहत आहोत की सगळीकडे कचरा बघून आपली सौंदर्यदृष्टीच नाहीशी झाली आहे.
गोष्टीपलीकडची गोष्ट पाहिलीच जात नाही. त्यासाठी स्वत:मधील विश्लेषणाची ताकद मिळवावी लागेल. याचा अर्थ पाश्चात्त्य सिनेमे चांगले आणि भारतीय सिनेमे वाईट असा नाही. भारतातील दर्जेदार सिनेमे परदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच कलात्मक सिनेमे चांगले आणि व्यावसायिक सिनेमे वाईट असेही नाही.संस्थेचे समन्वय समिती अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. स्नेहा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले.व्यक्तिरेखांच्या प्रेमातराणे म्हणाले, भारतीय रसिक व्यक्तिरेखांच्या खूप प्रेमात असतात; म्हणून कलाकारही आपल्या त्याच त्या प्रतिमांना चिकटून असतात. बाईचं शरीर दाखविण्यासाठीच असतं, हे मानून मनोरंजनाची पातळी घसरली आहे. अमुक एका मालिकेत मेलेला हिरो जिवंत व्हावा म्हणून देशभर पूजापाठ केले जातात. निर्मात्यांना ती व्यक्तिरेखा पुन्हा आणावी लागते. त्याच वेळी बंगालच्या सीमेवर २२ जवान शहीद होतात, या घटनेने कोणी हळहळत नाही, ही शोकांतिका आहे.