महिला सबलीकरणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना अजूनही उद्योग क्षेत्रामध्ये महिला संख्येने कमी दिसतात. स्वत: उद्योजक असलेल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथितयश अशा कोल्हापूर महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या शैलजा सूर्यवंशी यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : आपण उद्योजकतेकडे कशा वळलात ?उत्तर : माझे वडील विलासराव माने हे कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योजक, त्यामुळे माहेरी उद्योगाचे वातावरण होतेच. लग्नानंतर पती उदय सूर्यवंशी यांचाही फौंड्री उद्योग होता; त्यामुळे सासरीही उद्योजकतेसाठी पूरक अशी परिस्थिती होती; मात्र मी स्वत: उद्योग करावा, अशी परिस्थिती नव्हती; पण मी एम.बी.ए. झालेली. फौंड्रीमध्ये अकाउंटचे काम पाहत होते; मात्र माझे मन मला स्वस्थ बसू देत नव्हते. काहीतरी स्वतंत्र निर्माण करण्याची ऊर्मी मनात होती. त्यातूनच मी बगीचासाठीलागणारे स्टँड आणि इतर वस्तू तयार करून त्याचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनमध्ये भरविले. ही घटना १९८२ सालची आहे. इथूनच माझ्या उद्योजकीय कारकिर्दीचा पाया घातला गेला.
प्रश्न : पण, आता जो आपला पावडर कोटिंगचा मोठा व्यवसाय आहे, त्याकडे कशा वळलात?उत्तर : या पहिल्या प्रदर्शनामध्ये पहिल्या दोन तासांमध्ये सर्व वस्तू विकल्या गेल्या. नागरिकांची मागणी होतच होती, मग मात्र मी मार्केटचा अभ्यास करून पावडर कोटिंग फर्निचरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज २0 कर्मचाºयांच्या माध्यमातून हा माझा व्यवसाय सुरू आहे. घरगुती, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स अशा विविध ठिकाणी लागणाºया फर्निचरचे उत्पादन आम्ही करतो. पुणे, मुंबईपासून पाच ठिकाणी आमची शोरूम्स आहेत. आम्ही या व्यवसायातील कोल्हापुरातील पायोनिअर आहोत.
प्रश्न : महिला बँकेमध्ये आपला प्रवेश कसा झाला ?उत्तर : लतादेवी जाधव यांनी मला महिला बँकेमध्ये घेतले. माझे शिक्षण, उद्योगाची आवड या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी मला येथे संधी दिली. गेली ३३ वर्षे मी येथे कार्यरत असून, १२ वर्षे पाचव्यांदा या बँकेची अध्यक्षा म्हणून काम पाहत आहे. माझ्या सर्व सहकाºयांनी ही संधी मला दिली; त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील एक अग्रगण्य बँकम्हणून आम्ही कार्यरत आहोत. ७८ कोटींच्या ठेवी, ४९ कोटींची कर्जे, ८२ लाखांचा नफा आणि १२ हजारांहून अधिक सभासद ही आमच्या बँकेची वैशिष्ट्ये आहेत.
प्रश्न : बँकेच्या वतीने महिलांसाठी काही विशेष योजना आहेत का?उत्तर : रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम पाळून आम्ही बँक चालवितो; त्यामुळे याकडे व्यवसाय म्हणून पाहताना आम्ही केवळ महिलांना कर्जे देऊ शकत नाही. कारण आमच्याकडे महिला कर्जदारांची कर्जाची रक्कम कमी असते; मात्र मोठे कर्ज घेणारे पुरुष अधिक असतात. त्यांनाही आम्ही कर्जे देतो; मात्र सर्वसामान्य महिलांना दोन लाखांपर्यंत विनातारण कर्ज देण्याची आमची योजना महिला वर्गामध्ये लोकप्रिय आहे. आज हजारो महिला आमच्या या भांडवलावर छोटे-छोटे व्यवसाय अतिशय चिकाटीने आणि यशस्वीपणे करताना दिसत आहे. त्याचे आम्हाला मोठे समाधान आहे. महिला उद्योजकांचा सत्कार, त्यांंच्या मुलांचे सत्कार, एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाºया महिलांचा गौरव, असे अनेक उपक्रम आम्ही राबवितो.
प्रश्न : उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचे प्रमाण कमी दिसते, याला काय कारण ?उत्तर : सेवा असो किंवा उद्योग. महिलांमध्ये मोठी क्षमता आहे. एकीकडे घरचे सर्व व्याप सांभाळून त्याच पद्धतीने नोकरी, व्यवसाय करण्याची तिची ताकद आहे. व्यवस्थापन कौशल्य तिच्याकडे जन्मत:च आहे. एकावेळी चार कामे ती सहजगत्या पार पाडत असते; परंतु उद्योगासाठी जी जोखीम घेण्याची वृत्ती लागते, तिथे आम्ही महिला थोड्या कमी पडतो, असे माझे निरीक्षण आहे.
प्रश्न : यासाठी काय करावे लागेल, असे वाटते ?उत्तर : अजूनही सामाजिक वातावरण बदलण्याची गरज आहे. महिला उद्योजक मग ती मोठी असो किंवा छोटी, गरीब असो किंवा श्रीमंत याचा भेदभाव न बाळगता तिला पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. हे वातावरण तयार होईपर्यंत महिलांनी घरात बसून उपयोग नाही, तर चिकाटीने आपले कौशल्य पणाला लावून काम सुरू करावे लागेल. पाठबळ द्यायला प्रत्येकवेळी कोणीतरी येईल म्हणून वाट पाहून उपयोग नाही. कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला पुढे जायचे आहे, ही जिद्द अंगी बाणवली पाहिजे. यातूनच नव्या महिला उद्योजक घडायला मदत होईल, असे मला वाटते.- समीर देशपांडे.