सरदार चौगुले ।पोर्ले तर्फ ठाणे : गरिबी जन्माची वैरीण बनून राहिल्याने त्यांच्या जीवनात दु:खांचे अडथळे काही कमी झालेले नाहीत. आजारपणामुळे नियतीच्या डावात हारलेल्या आई-वडिलांना मृत्यूने कवटाळल्याने मायेसाठी ती पोरकी झाली आहेत. बहिणीच्या विरहानंतर तिघा अनाथ पोरांपैकी मामाने बहीणभावाचा, तर एका मुलीचा सांभाळ चुलता करीत आहे. जाफळे गावातील पाटील कुटुंबातील प्रतीक्षा, पायल आणि प्रतीक या भावंडांची ही कहाणी. त्यांच्या शिक्षणासाठी एका सक्षम आधाराची गरज आहे. आधार मिळाला तरच ते आयुष्यात उभे राहतील.
वीस वर्षांपूर्वी उत्तम पाटील यांच्याशी पोर्लेतील मेघाचे लग्न झाले होते. त्यांची ही तीन मुलं आहेत. पाटील कुटुंबाचं गरिबीशी मिळतंजुळतं घेत रोजगार करून पोट भरणं सुरू होतं. प्रतीकच्या जन्मावेळी वडिलांचा आजाराने मृत्यू झाला. आई तिन्ही पोरांचा सांभाळ करीत होती. तिने शिक्षणाच्या आड गरिबी येऊ दिली नाही. मामानं प्रतीक्षा व प्रतीकला आजोळात सांभाळण्यासाठी नेले. पायल आईजवळ राहिली. अशातच दोन महिन्यांपूर्वी आईचेही निधन झाले. पोरांचा तोडकामोडका आधारही गेला. सध्या प्रतीक्षा व प्रतीकचा सांभाळ मामा करीत आहे, तर पायल चुलत्याजवळ राहत आहे.
दहावीत ९४ टक्के गुण मिळविलेल्या प्रतीक्षा न्यू कॉलेजमध्ये बारावीत शिकते. तिने अकरावीला ८० टक्के गुण मिळविले आहे. तिचं सायन्समधून मेडिकलला किंवा बी.ई. करण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण परिस्थिती आड येण्याची तिला भीती वाटते. प्रतीक पोर्लेतील जि.प.च्या शाळेत सातवीत शिकत आहे. पायल बुधवारपेठ (पन्हाळा) येथील कन्या शाळेत दहावीला आहे. प्रतीक्षाचा शैक्षणिक खर्च मामाच्या आवाक्याबाहेर जात आहे. प्रतीक व पायलचा पुढचा शैक्षणिक खर्च प्रश्नचिन्ह बनून मामाच्या डोळ्यांसमोर जात नाही. गरिबीच्या डावाबरोबर या बहीण-भावाची कसोटीच लागली आहे.
परिस्थितीमुळे अडचणींवर मात करण्याची ताकद नसली तरी त्यांच्या शिक्षणातील महत्त्वाकांक्षापुढे एक दिवस गरिबीलासुद्धा नतमस्तक व्हावं लागेल, हे त्यांच्या शैक्षणिक यशातून दिसते. पण, परिस्थितीशी लढणाऱ्या हुशार बहीण-भावंडांना एका सक्षम आधाराची नक्कीच गरज आहे.मामाच्या नशिबीही गरिबीच.....पोर्ले तर्फ ठाणेतील अरुण घाटगे या मामाची परिस्थिती प्रतीक्षेपेक्षा वेगळी नाही. गुंठाभर शेत नसलेला मामा लाईट फिटिंग करतात. त्यांची पत्नी व एक बहीण रोज एकाच्या बांधावर रोजगाराला जाऊन कुटुंबासह इतर खर्च बघतात. कुटुंब खर्चासह स्वत:च्या व बहिणीच्या पोरांच्या शैक्षणिक खर्चाचा ताळमेळ बसविताना मामाला नाकीनऊ होत आहे.मैत्रिणींची माणुसकीपरिस्थिती माणसाला घडवते आणि जगायलाही शिकवते. या पोरांना शाळेत हुशार बनविण्यासाठी परिस्थितीच कारणीभूत आहे. आपल्या गरिबीची जाणीव असलेल्या पोरांनी आई-मामाकडे जादा क्लासेस, सहिलीसाठी, नवनीत, अवास्तव शैक्षणिक खरेदी किंवा खाण्यापिण्यासाठी कधीचं हट्ट केला नाही. क्रमिक पुस्तकांचे वाचन करूनच परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत. सायन्स शिकताना आर्थिक दमछाक झालेल्या प्रतीक्षेच्या मैत्रिणींने क्लासच्या नोट्स देऊन तिच्यासाठी माणूसकीतलं देवपण जपलं आहे.