भारत चव्हाणकोल्हापूर : राजा असूनही ऋषींसारखे सामान्य जीवन जगून उपेक्षितांना न्याय देण्याची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम उपेक्षित राहिले आहे. गेले तीन वर्षे या ९ कोटी ४० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करीत आहे. शरद पवारांनी सांगितले, मंत्र्यांनी आदेश दिले; पण प्रशासनातील शुक्राचार्य मात्र प्रस्तावात त्रुटी काढण्यातच व्यस्त आहेत.
कोल्हापूरच्या इतिहास संशोधक तसेच शाहूप्रेमी कार्यकर्त्यांनी शाहू समाधीचा विषय चर्चेत आणला. राजर्षी शाहू महाराज यांनी जिवंत असताना आपली समाधी सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेत व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार नर्सरी बागेत समाधी स्मारक उभारण्याची मागणी महानगरपालिकेकडे करण्यात आली. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तसा निर्णय घेतला. त्यांच्या अधिकारात आवश्यक तो निधी पालिकेच्या स्वनिधीतून देण्याचे मान्य केले. पालिकेने शाहू समाधी स्मारकाच्या कामाचा दोन टप्प्यावर प्रस्ताव तयार केला. पहिल्या टप्प्यात २ कोटी ७७ लाख रुपये खर्च करून समाधी स्मारक उभे करण्यात आले.
त्याचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते १९ जानेवारी २०२० मध्ये झाला. तेव्हा तत्कालीन महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी पवार यांच्याकडे दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. पवारांनी ते मनावर घेतले. समाजकल्याण विभागाकडून निधी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पुढे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. बैठकीत निधी देण्यास तत्त्वत: मान्यता दिली; पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेण्याची सूचना करण्यात आली.
तेव्हापासून प्रशासनातील अधिकारी तांत्रिक मंजुरीचे कागदी घोडे कोल्हापूर, पुणे, मुंबई असे नाचवीत आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. ६ मे २०२२ या शाहूंच्या स्मृती शताब्दीपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झालेले असेल असे शरद पवार यांनी सांगितले होते; परंतु अधिकाऱ्यांमधील दिरंगाईमुळे अद्याप कामाला तांत्रिक मंजुरी तसेच निधी मिळालेला नाही. एकीकडे शाहू स्मृती शताब्दीनिमित्त राज्यभर कृतज्ञता पर्व म्हणून शाहूंचे विचार पोहोचविण्याचे प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शाहू समाधी स्मारकाला निधी न देऊन उपेक्षा केली जात आहे.
- पहिल्या टप्प्यातील कामासाठी २ कोटी ७७ लाख खर्च
- दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी ९ कोटी ४० लाखांचा निधी अपेक्षित
दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण
- या हॉलमध्ये आर्टगॅलरी, डाक्युमेंट्री दाखविण्याची सोय
- दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कंपाउंड वॉल, लॅन्डस्केपिंग
- पार्किंग सुविधा तसेच टॉयलेट्स बांधणी
- परिसरातील सात समाधी, तीन मंदिरांचे दुरुस्तीसह नूतनीकरण
मविआ सरकारकडून दिरंगाई
शाहू समाधी स्मारकासाठी मागच्या भाजप सरकारच्या काळात दमडीही मिळाली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने स्वत:च्या निधीतून समाधी स्मारक उभारले; पण गेल्या दोन-अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडूनही दिरंगाई होऊ लागल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील काम कधी होणार, हा प्रश्न शाहूप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे.