चंदगड : डोंगराकडील सामाईक शेतीच्या वादानंतर परत झालेल्या झटापटीत अल्पवयीन पुतण्याने चुलत्याचा विळ्याने गळा चिरून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली असून, त्याच्यासह पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या आतेभावालाही अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला बुधवारी यश आले. गणेश परशराम झंगरुचे (वय २६, रा.सोनाेली, ता.जि.बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिस व घटनास्थळावर मिळालेली माहितीनुसार, मृत वसंत पांडुरंग पाटील (रा.हाजगोळी) व अल्पवयीन पुतण्या यांच्यात डोंगराकडील सामाईक शेतीचा वाद होता. २७ मार्चला वसंत हे हाळ नावाच्या शेतात काजू वेचण्यासाठी गेले होते. त्याच वेळी पुतण्याही बकऱ्यांना चारा आणण्यासाठी तेथे गेला होता. मात्र, त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात ओंडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले व खोपीतील विळ्याने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून केला.त्यानंतर, मृतदेह पोत्यात भरून तो बाजूला ठेवून त्याने थेट सोनोली गाव गाठले. तेथे आपल्या आतेभाऊ गणेशला हा प्रकार सांगितला. मग परत दोघांनी हाजगोळीला येवून मृतदेह चारचाकी गाडीत घालून तुर्केवाडी-जंगमहट्टी दरम्यान असलेल्या हांजओळ नदीवरील बंधाऱ्यात आणून टाकला. गेले आठ दिवस या खुनाचे धागेदोरे मिळविण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक चंदगडमध्ये ठाण मांडून होते.दरम्यान, त्यांनी जुन्या वादाच्या अनुषंगाने पुतण्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, हा प्रकार बुधवारी उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांचे पथक, चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अली मुल्ला, पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती, हवालदार अमोल पाटील यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी परिश्रम घेतले.
पुरावे नष्ट करण्यासाठी बनावखुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृत वसंतची दुचाकी बहाद्दरवाडी येथे निर्जनस्थळी तर मोबाइल गणेशने कोवाड येथील ताम्रपर्णी नदीच्या जुन्या पुलाखाली आणून टाकला, तसेच मृताचे कपडेही जाळल्याची कबुली दोघांनीही दिली.
आठवड्यात छडा पोलिसांना गुमराह करण्यासाठी आरोपींनी खून झालेल्या ठिकाणापासून दुचाकी, मोबाइल, मृतदेह हे वेगळेवेगळ्या दिशेला टाकले होते, पण त्यावरही मात करत पोलिसांनी या प्रकरणाचा एका आठवड्यात छडा लावला.