कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीकडून नेर्ली (ता. करवीर) चे सरपंच प्रकाश रामचंद्र पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रकाश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांशी चर्चा करून कामाला लागा, असे सांगितले आहे. ही संधी पाच वर्षासाठीच असेही स्पष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रकाश पाटील यांच्या उमेदवारीमुळे गोकूळच्या रणधुमाळीत सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान होणार आहे.
गोकूळच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून पॅनेल बांधणीसाठी खलबते सुरू आहेत. पॅनेलमध्ये पालकमंत्री पाटील हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एकाला संधी देणार हे निश्चित आहे. त्यासाठी अनेकांचे अर्ज आहेत. प्रकाश पाटील यांनी कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी मिळवली असून २००२ पासून ग्रामपंचायत सदस्य असून अडीच वर्षे ते उपसरपंच होते. सध्या नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच आणि भैरवनाथ दूध संस्थेचे संचालक आहेत.
पालकमंत्री पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांनी प्रकाश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांपूर्वी अजिंक्यतारा कार्यालय येथे बोलवून तुमची उमेदवारी निश्चित आहे; तुम्ही कामाला लागा, असे सांगितल्याचे समजते. उमेदवारीबाबत समजल्यावर प्रकाश पाटील हे भारावून गेले. एका छोट्या गावच्या सरपंच म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अशी संधी मिळणे हे भाग्य आहे अशा भावना त्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या.
---------
धक्कातंत्र
सतेज पाटील यांनी गोकूळसाठी उमेदवारी देताना यंदाही धक्कातंत्र अवलंबले आहे. गोकूळच्या २००७ च्या निवडणुकीतही सतेज पाटील यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर बाबासाहेब चौगले यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ध्यानीमनी नसताना संधी देऊन संचालक केले होते.