कोल्हापूर : अवैध व्यवसायप्रकरणी घरावर छापा टाकला, कडक कारवाईची भिती दाखवली पण कारवाई टाळण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना नेसरी पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पुंडलीक विठ्ठल पाटील (वय ५१ रा. कडलगे, ता. चंदगड) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.ही घटना शनिवारी दुपारी नेसरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. गेल्या अडीच महिन्यात पोलीस खात्यातील चार लाचखोरीच्या घटनात पाचजण गजाआड डांबले.याबाबत माहिती अशी की, नेसरी पोलीस ठाण्याच्या हद्दील एकाच्या घरावर अवैध व्यवसायप्रकरणी पोलिसांनी छापा टाकला. त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई न करण्यासाठी नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पुंडलीक पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांना माहिती दिली. पडताळणी अंती लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून पाच हजाराची लाच घेताना सहायक फौजदार पुंडलीक पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर, सुरज अपराध यांनी केली.
पोलीस ठाण्याच्या आवारातच नेसरीचा सहाय्यक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 6:04 PM