कोल्हापूर : इंधनाचे दर वाढल्यामुळे गेले तीन महिने रिक्षाभाडे वाढ करण्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जर २४ तासांत ही वाढ झाली नाही तर भाजप आणि कॉमन मॅन रिक्षा संघटनेच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर केव्हाही आंदोलन करू, असा इशारा भाजप आणि कॉमन मॅन रिक्षा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, रिक्षा भाडे वाढीबाबत शासनाने हकीम समितीचे सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार नवीन रिक्षाची किंमत, महागाई निर्देशांक, इंधन दर, विमा दर, देखभाल दुरूस्तीचा खर्च, टायरची किंमत या घटकांचा भाडेवाढ करताना विचार करावा, असे सुचविले आहे. इंधनाची किंमत वाढविल्याने आता रिक्षा भाडेवाढ करण्याची गरज आहे.
कॉमन मॅनचे अविनाश दिंडे म्हणाले, विमा दर वाढलेला असल्यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला. लॉकडाऊनच्या काळात तो बंद करावा लागला. यासाठी भाजप आणि कॉमन मॅनतर्फे मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १४० दिवसांची विमा मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा लाभ घेण्यासाठी रिक्षाचालकांनी बिंदू चौकातील भाजप कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत येऊन विमा व रिक्षा नोंदणीची कागदपत्रे आणून अर्ज भरून द्यावा. एकही पैसा खर्च न करता हा मुदतवाढीचा लाभ देण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई, नरेंद्र पाटील, संजय भोळे, राहुल रायकर, जाफर मुजावर उपस्थित होते.
चौकट
रिक्षाचालकांच्या मुलींना मदत जाहीर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावतीने रिक्षाचालकांच्या बारावी किंवा त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बसपास, शासकीय फी, गणवेश किंवा वह्या पुस्तके यापैकी एकाची त्यांच्या गरजेनुसार मदत करण्यात येणार आहे. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ही घोषणा केली.