कोडोली : कोडोली ( ता पन्हाळा ) येथील यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत नवीन अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालय पोलिस ठाण्याच्या समोरील इमारतीत सुरू करीत आहे. या हॉस्पीटलचा शुभारंभ गुरुवार ता. १३ रोजी आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णांची संख्या विचारात घेता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची तसेच बेडची संख्या अपुरी पडत आहे. सध्या शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात पुर्ण वेळ कोविड रुग्णालय नसलेने रूग्णांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे.
बाधित रुग्णांच्यावर तातडीने उपचार व्हावेत या उद्देशाने यशवंत धर्मार्थ रुग्णालयाच्यावतीने येथील स्वतंत्र असे कोडोली पोलीस ठाण्यासमोरील इमारतीत शंभर बेडचे रुग्णालय सुरू होत आहे. यामध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले ३० व मॉनिटर सुविधा असलेले ५ बेडस असणार आहेत. राज्य शासनाच्या व एन ए बी एच च्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करणेत आल्या आहेत.
या रूग्णालयात आयुर्वेद व अलोपॅथी अशा दोन्ही औषध उपचार पध्दतीचा वापर केला जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उप विभागीय अधिकारी अमित माळी तहसिलर सरपंच आदी उपस्थितीत असणार आहेत. या परीषदेस आयुर्वेदिक महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. अभिजित इंगवले, डॉ. हर्षल साबळे उपस्थित होते.