कोल्हापूर : शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने गुरुवारी जाहीर केले. ही फेरी सोमवार (दि. १४) पासून सुरू होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नव्याने अर्ज करता येणार आहे.
या समितीची बैठक यशवंतराव चव्हाण कॉलेज (केएमसी)मध्ये झाली. त्यातील निर्णयानंतर दुपारी दोनच्या सुमारास वेळापत्रक जाहीर झाले. पहिल्या फेरीची प्रक्रिया बुधवारी संपली.त्यामध्ये ५८३५ जणांनी प्रवेश निश्चित केले.
समितीकडे अर्ज केलेले अद्याप ६८५६ विद्यार्थी हे प्रवेशित शिल्लक आहेत. या जागांसाठी दुसऱ्या फेरीत प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या फेरीमध्ये कोणतेही महाविद्यालय अलॉट झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत निश्चितपणे प्रवेश मिळणार आहे.
या बैठकीस समितीचे सचिव सुभाष चौगुले, कार्याध्यक्ष प्रशांत नागावकर, एस. एस. चव्हाण, टी. के. सरगर, रवींद्र पोर्लेकर, राजेंद्र हिरकुडे उपस्थित होते. दरम्यान, दुसरी फेरी ही अंतिम फेरी असेल. त्याद्वारे अलॉट झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. त्यानंतर कोणताही प्रवेश केंद्रीय समितीकडून केला जाणार नसल्याचे चौगुले यांनी सांगितले.दुसऱ्या फेरीत काय करता येईल?१) ज्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये बदल करावयाचा आहे, त्यांनी आपला पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगिन करून रद्द करावा. नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरावा.२) ज्या विद्यार्थ्यानी अद्यापही रजिस्टर भाग एक, दोन भरलेला नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन अर्जा करता येईल.३) ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये महाविद्यालय अलॉट होऊन त्यांनी प्रवेश निश्चित केलेला नाही, अर्जाच्या भाग दोनमध्ये कोणताही बदल करणार नाहीत, त्यांची नावे दुसऱ्या फेरीमध्ये ऑटो शिफ्ट होतील.दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
- अर्ज करणे : १४ ते १६ डिसेंबर
- अर्जांची छाननी : १७ ते १९ डिसेंबर
- निवड यादीची प्रसिद्धी : २१ डिसेंबर
- प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही : २१ ते २३ डिसेंबर
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
- दाखल अर्ज : १२६९१
- पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : ५८३५
- प्रवेशित शिल्लक विद्यार्थी : ६८५६