कोल्हापूर : जिल्ह्याची विकास वाहिनी असलेल्या उद्योग क्षेत्राला कोरोनामुळे गेल्यावर्षी धक्का बसला. लॉकडाऊनच्या सुरुवातीला शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत दोन महिने उद्योग बंद राहिले. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून उद्योग सुरू झाले. कोरोनामुळे बाजारपेठेतील बदललेली मागणी लक्षात घेऊन कोल्हापूरमधील उद्योजकांनी आपल्यासह कामगारांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले.
फौंड्री, मशीन शॉपसह अन्य क्षेत्रातील या उद्योजकांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारे व्हेंटिलेटर, बेड, सलाईन, सॅनिटायझर स्टँड आदी साहित्यांचे उत्पादन सुरू केले. आयटी उद्योगाने टेलिमेडिसीन, वैद्यकीय यंत्रणेसाठी लागणाऱ्या संगणक प्रणालीची निर्मिती केली. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी मास्क, पीपीई कीटचे उत्पादन केले. जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन केले. सॅनिटायझर, पीपीई कीट, मास्क, व्हेंटिलेटरची देशासह जगभरात निर्यात झाली. ऑनलाईन व्यवहार वाढले. आरोग्यविषयक उत्पादनांच्या विक्रीकडे व्यापारी, व्यावसायिकांनी पावले टाकली. कोरोनामुळे आपापल्या गावी निघून गेलेले परप्रांतीय मजूर, नवीन कामाच्या नसलेल्या ऑर्डर्स, प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, आदी विविध अडचणींवर मात करत उद्योग क्षेत्राने वाटचाल सुरू केली. सध्या ९० टक्क्यांपर्यंत उद्योग क्षेत्र पूर्वपदावर आले आहे.