गडहिंग्लज : आकाशाला भिडलेल्या महागाईत सर्वसामान्यांना जगणेदेखील मुश्कील झाले आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, देवदासी, दलित व महिलांचे प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नव्या लढाईला सज्ज व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केले.येथील साधना प्रशालेत आयोजित जनता दल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जनसंघर्षामुळे मिळालेली सत्ता व सामान्य कार्यकर्त्यांना मिळालेला मान-सन्मान, याचा आढावाही त्यांनी घेतला. कार्यकर्त्यांत आलेल्या मरगळीबद्दल खंत व्यक्त करतानाच आगामी निवडणुका व सामान्य जनतेसाठी पुन्हा कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिंदे म्हणाले, गावागावांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी आपले रक्ताचे नाते आहे. त्यांच्या पाठबळावरच आपण वाटचाल केली. संघर्षातून मिळालेल्या सत्तेचा जनतेसाठी उपयोग केला. यापुढेही सर्वसामान्यांसाठी संघर्ष आणि तत्त्वाचेच राजकारण केले जाईल. बाळेश नाईक म्हणाले, रेशनवरील धान्य, विजेची दरवाढ, भारनियमन, आदी प्रश्नांवर आंदोलनाची गरज आहे. शैलेश पाटील म्हणाले, नाउमेद न होता पुन्हा कार्यकर्त्यांनी पक्षकार्यात झोकून द्यावे.बापू म्हेत्री म्हणाले, देवदासी, दलित, बेरड व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा संघर्षाची गरज आहे.निंगाप्पा भमानगोळ म्हणाले, लोकांचे प्रश्न घेऊन लढल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस आणि प्रतिष्ठा नक्कीच मिळेल. यावेळी चंद्रकांत बंदी, अजित शिंदे यांचीही भाषणे झाली.बैठकीस गडहिंग्लज कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोरे, श्रीपती कदम, बाळासाहेब मोकाशी, भीमराव पाटील, शिवाजी काकडे, राम मजगी, बाळासाहेब शिंदे, गणपती नेवडे, रमेश मगदूम, तानाजी नाईक, उदय कदम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दत्ता मगदूम यांनी स्वागत केले. शशिकांत चोथे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जनतेच्या प्रश्नांवर नव्याने लढाई
By admin | Published: February 16, 2015 12:23 AM