संतोष बामणे--जयसिंगपूर --सहकारक्षेत्रात अग्रेसर असलेल्या चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत गावाचा कारभार चालत असलेल्या इमारतीची दुरवस्था झाल्याने अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे घेवून चिंचवाड ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या निर्णयानुसार अखेर नूतन ग्रामपंचायत इमारत होणार असल्याने चिंचवाडच्या गतवैभवात भर पडणार आहे. यासाठी २८ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.चिंचवाड हे गाव कृष्णानदी काठावरील सधन गाव आहे. तर शिरोळ तालुक्याच्या सहकारक्षेत्रात चिंचवाड गावाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे गावच्या कारभारासाठी जुनी ग्रामपंचायत इमारत अपुरी व नादुरुस झाल्याने विकासाच्या कामाला खीळ बसत होती. या ग्रामपंचायतीची स्थापना १९५०ची असून, त्या काळातील ग्रामपंचायत इमारत आपली सेवा बजावत आहे. गावकारभाराला अडचणी येत असून, अकरा सदस्यांनी ग्रामपंचायत इमारत बांधण्याचे ठरविले आणि निधी उपलब्ध करण्यात सदस्यांना अखेर यश आले आहे.आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून १२ लाख, तसेच १४ व्या वित्त आयोगांतर्गत ८ लाख ५० हजार रूपये तर कर्ज ८ लाख रुपये असा एकूण २८ लाख ५० हजार रूपये खर्चाची नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाला येत्या आठवड्याभरात प्रारंभ होणार आहे. यामध्ये ग्रामसेवक कक्ष, सरपंच कक्ष, मिटींग कक्ष, ग्रामसभा सभागृह, स्वच्छतागृह, वाचनकट्टा असे इमारतीत विभाग असणार आहेत.सहा महिन्यांत ९४ लाखांचा निधीचिंचवाडच्या विकासासाठी गेल्या सहा महिन्यांत खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील व जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांच्या फंडातून सुमारे ९४ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून गावातील रस्ते, समाज मंदिर, अभ्यासिका बांधण्यात येणार आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून ८ लाख ५० हजारांचा निधी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तर विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी सरपंच विमल कदम, उपसरपंच प्रमोद चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा पाठपुरावा आहे. आजही गावसभा पारकट्ट्यावर चिंचवाड येथे ग्रामपंचायतीची इमारत अपुरी व नादुरूस्त असल्याने ग्रामपंचायतीची अवस्था कोंडवाड्यासारखी बनली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कागदपत्रे भिजणे, पडझड होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गावसभा घेण्यासाठी सभागृह नसल्यामुळे तसेच जुन्या काळातील आठवण देणारी पारकट्ट्यावरील गावसभा आजही चिंचवाडमध्ये पारकट्ट्यावरच होते, हे एक चिंचवाडचे वैशिष्ट्य आहे. सध्या गावातील विकासकामे पूर्णत्वाकडे आली असून, ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चिंचवाड हे गाव विकासाच्या एक पाऊल पुढे जाणार आहे. - जालिंदर ठोमके, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड
चिंचवाड ग्रा.पं.ला नवीन इमारत
By admin | Published: January 04, 2017 11:30 PM