तुरंबे : अभ्यासक्रम बदलला की पाठ्यपुस्तके केव्हा उपलब्ध होणार याबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालकांत मोठी उत्सुकता असते. यावर्षी इयत्ता आठवी व दहावीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. नवीन रचनेनुसार अध्यापन सुलभ व्हावे यासाठी पुस्तके बाजारपेठेत वेळेत येणे अपेक्षित असते. त्यापैकी दहावीची पुढील शैक्षणिक वर्षाची पुस्तके या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शिवाय नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण ५ एप्रिलपासून राज्यभर सुरू होणार आहे. लगेचच तालुकास्तरावरील प्रशिक्षणे २० एप्रिलअखेर पूर्ण करण्याचा विभागीय मंडळांचा मनोदय आहे.
इयत्ता आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. नवीन पाठ्यपुस्तके कशी असतील याबाबत शिक्षक, विद्यार्थी वर्गात उत्सुकता आहे. प्रतिवर्षी नववीची वार्षिक परीक्षा संपताच दहावीच्या अध्यापनास सुरुवात होते. त्यामुळे पुस्तके लवकर उपलब्ध झाली तर खूप सोयीस्कर होणार आहे. गेल्यावर्षी नववीचा अभ्यासक्रम बदलला. शाळा १५ जूनला सुरू झाली. मात्र, पुस्तके बाजारात यायला उशीर झाला. त्यामुळे शिक्षकांची प्रशिक्षणे रखडली. यावर्षी ५ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत. सर्वच विभागीय मंडळांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण ५ एप्रिलपासून व लगेचच तालुका पातळीवरील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शाळांना उन्हाळी सुटी लागण्यापूर्वीच २० एप्रिलअखेर प्रशिक्षण टप्पा पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. एक पुस्तक संच खरेदी करण्यासाठी जवळपास सव्वासहाशे रुपये लागणार आहेत, तर मोफत पाठ्यपुस्तके आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत वाटली जाणार आहेत.राज्यस्तरीय दहावी प्रशिक्षण वर्गाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे, कंसात तालुकास्तर तारखा अशा : मराठी ५ एप्रिल (९ एप्रिल ), इंग्रजी ६ एप्रिल (१० एप्रिल), हिंदी ७ एप्रिल (११ एप्रिल), गणित ९ एप्रिल (१२ एप्रिल), विज्ञान व तंत्रज्ञान १० एप्रिल (१३ एप्रिल), इतिहास व राज्यशास्त्र ११ एप्रिल (१६ एप्रिल), भूगोल व अर्थशास्त्र १२ एप्रिल (१७ एप्रिल ), संरक्षणशास्त्र १३ एप्रिल (१८ एप्रिल), स्वविकास व कलारसास्वाद १६ एप्रिल (१९ एप्रिल), संस्कृत १७ एप्रिल (२१ एप्रिल).