कोल्हापूर : शाहू जन्मस्थळाचे पुढील काम दर्जेदार आणि योग्यरीत्या पूर्ण होण्यासाठी शासकीय समिती व संग्रहालयाच्या आराखड्यासाठी उपसमिती अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शाहू जन्मस्थळाच्या मुख्य इमारतीची कौले बदलणे आणि परिसरात तयार करण्यात आलेली साठमारीची प्रतिकृती हटविणे असे महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. शाहू जयंतीच्या शुक्रवारी (दि. २६) झालेल्या सोहळ्यानंतर शाहू जन्मस्थळ येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर शाहू जन्मस्थळ समितीतील सदस्यांनी जन्मस्थळाच्या कामावर आक्षेप नोंदविला होता. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, रमेश जाधव, वसंतराव मोरे, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, आदी उपस्थित होते. यावेळी समिती सदस्यांनी आम्हाला विश्वासात न घेता शाहू जन्मस्थळाबाबत झालेल्या चुकीच्या कामांचा पाढाच वाचला. इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांनी इमारतींच्या कौलांवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, आम्ही पहिल्यांदाच सांगूनही जन्मस्थळाच्या सगळ्या इमारतींना सिमेंटच्या चुकीच्या खापऱ्या घालण्यात आल्या. कौलांवरून इमारतीचा काळ कळतो. मात्र सातत्याने आमच्याशी आणि मंत्र्यांशी खोटे बोलण्यात आले. यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी सगळ्या इमारतींची कौले बदलणे शक्य आहे का, असे विचारले असता अमरजा निंबाळकर यांनी ‘नाही’ असे सांगितले. त्यावर सावंत यांनी किमान शाहू जन्मस्थळाच्या मुख्य इमारतीची कौले बदलली जावीत, असा आग्रह धरला. यावर एकमत होऊन मुख्य इमारतीची कौले बदलण्याचा निर्णय झाला. डॉ. रमेश जाधव यांनी साठमारीला आठ बुरूज असतात. इथे एकाच बुरुजातून तुम्ही काय दाखवणार आहात, असा प्रश्न केला. वास्तविक कोल्हापुरात पाच ठिकाणी साठमारी असताना परिसरात दुसरी प्रतिकृती निर्माण करण्याची गरजच काय? परिसरात सगळीकडे दगडी बांधकाम करून काय साध्य करणार आहात? मुख्य इमारतीसमोर फक्त हिरवळ, बागबगीचा असला पाहिजे, असे मत सगळ्यांनी मांडले. यावर डॉ. जयसिंगराव पवार यांनी साठमारी ही संग्रहालयातील मिनीएचर प्रकारात बनविली जावी, असे सुचविले. त्यानुसार साठमारी म्हणून तयार करण्यात आलेला एक बुरूज काढून टाकण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, यापूर्वी झालेल्या चुकीच्या गोष्टी मागे सोडून जन्मस्थळाच्या विकासासाठी आपण नव्याने सुरुवात करू. शासकीय समिती आणि संग्रहालयासाठी उपसमिती स्थापन करू. त्या-त्या समितीने दिलेल्या कालावधीत काम करणे ही त्यांची जबाबदारी असेल. पुढील बैठक २५ जुलै रोजी होणार असून त्यात माहिती देणे अपेक्षित असेल.
शाहू जन्मस्थळासाठी नवीन समिती
By admin | Published: June 28, 2015 12:54 AM