कोल्हापूर : राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधीलआमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे आणि ऋतुराज पाटील यांचा समावेश होता.
कोल्हापूर भाजपमुक्त केल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि आमदार सतेज पाटील यांचे खर्गे यांनी अभिनंदन केले. काँग्रेसला साथ दिल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेला त्यांनी धन्यवाद दिले.या कार्यक्रमात कोल्हापूरकर आणि नवनिर्वाचित आमदारांच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे यांना पुष्पगुच्छ देऊन आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी सत्कार केला. राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संयुक्तपणे खर्गे यांचा सत्कार केला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांनी जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासह विकासकामांवर भर द्यावा. युवा आमदारांनी राजकारणातील बारकावे समजून घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भोगावती साखर कारखान्याची सभा असल्याने आमदार पी. एन. पाटील हे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून करण्यात आला. त्यात आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार केला. यावेळी डावीकडून आमदार राजूबाबा आवळे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते.