कोल्हापूर : किरणोत्सार (रेडिएशन) तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय तसेच संशोधनाच्या विविध क्षेत्रांना समाजोपयोगाचे जादुई आयाम लाभले आहेत, असे प्रतिपादन हृषीकेश येथील आॅल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) संचालक प्रा. डॉ. राज कुमार यांनी गुरुवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर अॅटोमिक एनर्र्जी रेग्युलेशन बोर्डाचे (ए. ई. आर. बी.) उपाध्यक्ष डॉ. आर. भट्टाचार्य प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर सभागृहात होणाऱ्या तीनदिवसीय परिषदेचा विषय ‘मटेरिअल सायन्स अॅँड आयोनायझिंग रेडिएशन सेफ्टी अॅँड अवेअरनेस’ असा आहे. डॉ. राज कुमार म्हणाले, कार, कॉरोनरी व कॅन्सर हे वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे. कार अर्थात रस्ते अपघातांत जखमी, मृत्युमुखी पडणाऱ्यांची मोठी संख्या पाहता याबाबत सुरक्षिततेविषयी जनजागृतीची गरज आहे. कॉरोनरी म्हणजे हृदयाशी संबंधित रोग आणि कर्करोगाच्या उपचारांबाबतीत मात्र, किरणोत्सार हे मोठे वरदान आहे. डॉ. भट्टाचार्य म्हणाले, किरणोत्सार हा अनियंत्रित पद्धतीने वापरला तर निश्चितपणे प्रचंड धोकादायक आहे. वापर करणाऱ्यांवर या तंत्रज्ञानाचे भवितव्य अवलंबून आहे. येणाऱ्या काळात आपल्या देशाला मोठा वृद्धिदर नोंदविण्याची गरज आहे. मात्र, ही वृद्धी ऊर्जेच्या वृद्धीशी निगडित राहील. त्यासाठी आपल्याला संवर्धनशील व पर्यावरणपूरक स्रोतांची चाचपणी करावी लागेल. त्यामध्ये अणुऊर्जेचा वरचा क्रमांक असेल. डॉ. शिंदे म्हणाले, मटेरियल सायन्स हेच मुळी मानवाच्या अस्तित्वाचे शास्त्र आहे. रेडिएशन तंत्रज्ञान मानवी जीवन सुसह्य व सुखकर करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहे. त्याचा सकारात्मक व कल्याणकारक वापर करण्याला प्राधान्य द्यावे. परिषदेचे उद्घाटन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कुंडकुलम एक्सपर्ट ग्रुपच्या एक्सिलरेटर सेफ्टी समितीचे माजी प्रमुख प्रा. एम. आर. अय्यर उपस्थित होते. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) ंअणुऊर्जा मॉडेल ठरले आकर्षण : प्रदर्शनामध्ये विविधांगी माहिती परिषदेनिमित्त विद्यापीठाच्या लोककला केंद्रात भारतीय अणुऊर्जा विभागातर्फे विशेष प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यात अणुऊर्जेसह किरणोत्साराचे सकारात्मक, समाजोपयोगी महत्त्व आणि वापर, किरणोत्सारी मूलद्रव्यांपासून आरोग्य दक्षता, कृषी व अन्य प्रक्रिया उद्योग, अणुऊर्जेचे उत्पादन व उपयोजन, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम, अणुभट्ट्यांची सुरक्षितता, स्वच्छ भारत व अणुऊर्जा, अणुऊर्जेच्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, आदींबाबतची माहिती आहे. ४अणुभट्टीचे मॉडेल या प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे.
किरणोत्सार तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय, विविध संशोधनाला नवा आयाम
By admin | Published: January 29, 2016 12:50 AM