कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची ओळख असलेल्या शिवपुतळा परिसराला आता नवे रूप मिळणार आहे. या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू झाले आहे. ते पूर्ण होण्यास दोन महिने लागणार आहेत.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्या परिसरात ५० वर्षांपूर्वी बगीचा करण्यात आला. त्याचा एकूण परिसर पाच एकर आहे. त्याच्या सभोवती असणाऱ्या संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याच्या दिशेने जाणाºया मार्गावरील फरशा जीर्ण झाल्या आहेत. त्यांवर पावसाळ्यामध्ये पाणी साठून शेवाळ होते. ही स्थिती या पुतळ्याच्या सौंदर्याला मारक ठरत आहे. ते लक्षात घेऊन या परिसराला नवे रूप देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्रशासनाने ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून संरक्षक कठड्यांचे दगडी बांधकाम केले जाणार आहे. फरशा बदलण्यात येणार असून फूलझाडांसह विविध नवी झाडे लावली जाणार आहेत. दरम्यान, याबाबत विद्यापीठाच्या स्थापत्य विभागाचे उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला अनुरूप संरक्षक कठड्यांचे बांधकाम केले जाणार आहे.
विद्यापीठातील शिवपुतळा परिसराला मिळणार नवे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:56 AM