नितीन भगवान -- पन्हाळा --पन्हाळा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बंदुकीचा वापर न होता शिकारी कुत्र्यांपासून शिकार करण्याचा नवा फंडा आला असून, गावागावांत आता शिकारी कुत्र्यांची संख्या वाढू लागली आहे.पन्हाळा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जागरुकता दिसून येत नाही. किंबहुना याबाबत वनविभाग पूर्णपणे उदासीन असून, शिकार करणाऱ्यांवर काहीही कारवाई होत नसल्याने कायद्याचा वचक न राहता फक्त फायद्याचे गणित होत असल्याची चर्चा आहे. यामुळे वन्य जिवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पन्हाळागडाच्या पायथ्याला बांदिवडे, इंजोळे, मसाई पठार, गुढे, राक्षी, सोमवार पेठ, आपटी, केकतवाडी, बोरिवडे व पन्हाळ्यातील रेडेघाट व पावनगड परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरात ससे, सांबर, भेकर, साळींदर, लांडोर, मोर, आदी वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. प्राणी दिवसा दाट जंगलात लपलेले असतात. शिकारी कुत्र्यांना यांचा वास लागतो आणि या कुत्र्यांकरवी राजरोस दिवसा शिकार केली जाते. शिकार सुलभ आणि लवकर होण्यासाठी डोंगर पेटविले जातात. आग लागल्याने वन्यप्राणी सैरावैरा धावू लागतात. याचा फायदा घेत वन्य जिवांची शिकार केली जाते. यासाठी पाळीव कुत्र्यांकडून रानडुक्कर व ससे यांची शिकार करून त्यांचे मांस विकण्याचाही व्यवसाय तेजीत आहे. शिकारी कुत्रे यांची परवाना फी वनविभागाने वसूल करून त्यांचे आणण्याचे प्रयोजन व त्यांच्याकडून करून घेतली जाणारी शिकार याबद्दल त्या त्या मालकांना मोठा दंड ठोठावून या शिकारी कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. वनविभागाने जर गांभीर्याने बंदोबस्त केला नाही, तर वन्य जिवांचे वैभव नष्ट होणार हे मात्र निश्चित. वन विभागाने जंगलात गस्त वाढवावीवन्य जिवांची हत्या रोखण्यासाठी वनविभागामार्फत गावोगावी समित्या नेमल्या आहेत. तसेच काही पर्यावरणपे्रमी संघटना, संस्था व मंडळे आहेत. तरीसुद्धा वन्य जिवांची शिकार होत असेल तर सर्वचजण सक्षमपणे आणि गांभीर्याने काम करीत नाहीत, असाच अर्थ होतो. या सर्वांना गंभीरपणे काम करण्यासाठी जनजागृती करून वन विभागाने जंगलात वारंवार गस्त घालणे गरजेचे आहे. वन्यप्राण्यांच्या या शिकारीबरोबरच बेकायदेशीर वृक्षतोडीला आळाही बसेल व जंगलांना आगी लावण्याचे प्रमाणही कमी होईल.
पन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी नवा फंडा
By admin | Published: April 22, 2016 12:19 AM