कोल्हापूर : शब्दातून एक गोष्ट सांगण्यासाठी फार वेळ लागतो. ती न समजल्यास केलेला प्रयत्न वायफळ जातो. ही बाब जाणून घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळांची माहिती, प्रेरणा देणारी वाक्ये, खेळातील क्षणचित्रे क्रीडा कार्यालयाच्या भिंंतीवर रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे क्रीडा कार्यालय नवा लूक घेत आहे.
शिवाजी स्टेडियममध्ये जिल्ह्याचे क्रीडा कार्यालय आहे, याची अनेकांना कल्पनाही नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक क्रीडा कार्यालयाचा पत्ता विचारताना मंगळवार पेठ, रविवार पेठ परिसरात दिसतात. या कार्यालयाने कधीच आपली वेगळी ओळख खेळाडूंपुढे ठेवली नाही. बाहेर केवळ दुचाकी आणि एक कार उभी असते. आत मात्र, तेच शासकीय पठडीतील वातावरण असा लूक या कार्यालयाचा होता. आता मात्र, नूतन जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांनी हा लूक बदलण्याचे ठरविले. त्यातून या कार्यालयाची बांधीलकी जिल्ह्यातील तमाम खेळाडूंची कायम राहावी. कार्यालयात आल्यानंतर तेथील वातावरणही क्रीडा परंपरेला साजेसे असे असावे,
या संकल्पनेतून कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत उजव्या व डाव्या बाजूस सायकलस्वार, नेमबाजी करणारा नेमबाजपटू, तलवारबाजी, हॉकी खेळतानाचा एक प्रसंग, जलतरण तलावात पोहणारे जलतरणपटू, स्केटिंग, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, अशी विविध चित्रे रेखाटण्यात आली आहेत. येणाऱ्या अभ्यागतांचे या चित्रांकडे आपोआपच लक्ष वेधले जाते. समोरील मोकळ्या जागेत कोल्हापुरी कुस्ती पंढरीत सुरू असलेली दोन मल्लांमधील कुस्ती, मैदानी स्पर्धेत धावण्याची स्पर्धा जिंकल्यानंतर ‘एस आय गॉट इट’ असे दर्शविणारा धावपटू, बुद्धिबळाचा पटाची माहिती दर्शविणारे चित्र, अशी एक ना अनेक चित्रे खेळाडूंना स्फुरण चढेल अशी रेखाटण्यात आली आहेत.विशेष म्हणजे, खेळाडूंना आपल्या शरीरात कोणते अवयव आहेत. शरीरातील ४७ स्नायूंची सविस्तर माहिती असणारी चित्रे व त्यांची शास्त्रीय नावे रेखाटले आहेत. ही सर्व चित्रे चित्रकार प्रज्ञेश संकपाळ, अनिकेत ढाल, सचिन कदम यांनी रेखाटली आहेत.
शब्दांपेक्षा चित्रातून लहानग्यांसह मोठ्यावरही चांगला प्रभाव पडतो. जी गोष्ट सांगून कळत नाही ती चित्रातून तत्काळ कळते. नव्या पिढीला खेळाविषयीचे ज्ञान पटकन व्हावे. त्यातून नवोदित मोबाईलपेक्षा मैदानाकडे अधिक ओढला जावा. त्यातून प्रोत्साहन देणारा परिसर व्हावा. याकरिता ही चित्रे रेखाटली आहेत.- चंद्रशेखर साखरे,जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर