कोल्हापूर : आॅगस्टमध्ये कोल्हापूर-सांगलीमध्ये महापुराने घातलेल्या धुमाकुळामुळे अनेकांचे घर जमिनदोस्त झाले. यात शिरोळ तालुक्यातील ‘कनवाड’ या गावाचाही समावेश होता. मानव सेवेत पुण्य शोधण्याच्या शिकवणीत वाढलेल्या ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’ या संस्थेने या गावातील कुटुंबांना नव्याने घरकूल उभारून देण्याची घोषणा केली आहे. गावातील ४0 कुटुंबांना साडेतीन लाख किमतीचे व ३00 स्क्वेअर फुटांचे वन बीएचके मोफत मिळणार आहे. मानवतेची सेवा म्हणून आलेल्या देणगीच्या रकमेतूनच घरकुलांच्या उभारणीसह गरजेप्रमाणे अन्य साहित्यही पुरविले जाणार आहे.
मुंबईस्थित ‘जमाअत-ए-इस्लामी हिंद’चे प्रदेशाध्यक्ष रिजवानूर्रहमना खान हे पूरकाळातील मदत कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. मुस्लिम बोर्डिंगमध्ये पत्रकार घेऊन त्यांनी संघटनेने आतापर्यंत केलेल्या कार्याची आणि भविष्यातील कामांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘संघटनेच्या आयडियल रिलीफ विंगमधील २५ सदस्यांनी महापूर आल्यापासून ते ओसरल्यानंतर सलग दोन महिने हातकणंगले, शिरोळ, पलूस या ठिकाणी मदतीचे काम केले. गावात रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य शिबिरे, डीडीटी पावडर फवारणी, शाळांच्या साफसफाईसह शैक्षणिक साहित्याचेही वाटप केले. याशिवाय या काळात औषधे, चादरी, संसारोपयोगी भांडी, कपडे असे जवळपास २५ लाखांहून अधिक रकमेचे साहित्य पूरग्रस्तांना वाटण्यात आले.
अनेक गावांत पडलेल्या घरांचे सर्व्हे करून घर बांधकामासाठी मदत देण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे जास्त नुकसान झाले असल्याने प्राधान्याने येथील घरे पहिल्या टप्प्यात बांधली जाणार आहेत; यासाठी राज्यभरातून देणगी संकलित केली गेली आहे. या बैठकीला अन्वर पठाण, अहमद पठाण, अल्ताफ शेख, अमानुल्ला शेख, अशपाक पठाण, मुसा जमादार उपस्थित होते.