असंसर्गजन्य आजारांमधील सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार मधुमेह (साखर) आहे. या मधुमेहावर शिवाजी विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अकल्पिता अरविंदेकर व त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक औषध निर्माण केले आहे. या औषधाबाबतचे संशोधन, त्याचा होणारा परिणाम, आदींबाबत डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : या औषधाबाबतच्या संशोधनाची सुरुवात कशी झाली?उत्तर : जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अधिक हालचाल न करावी लागणारी जीवनशैली, आरोग्यास अपायकारक ठरणाºया खाण्याच्या सवयी, चरबीयुक्त आहाराचे आणि तळलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर केले जाणारे सेवन, व्यायामाचा अभाव, आदींमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात सध्या ९२ लाख इतके मधुमेहाचे रुग्ण आहेत. मधुमेहाबाबत सध्या अॅलोपॅथी, आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत. यातील पारंपरिक आयुर्वेदिक औषधांना आधुनिक विज्ञानाच्या विविध कसोट्यांवर सिद्ध करणे आणि त्यातून जास्तीत जास्त परिणामकारक औषध निर्मितीच्या उद्देशाने डॉ. विवेक हळदवणेकर यांची मदत घेत शिवाजी विद्यापीठातील जैवरसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून आम्ही गेल्या १५ वर्षांपूर्वी संशोधन सुरू केले. यातील बहुतांश संशोधनाचे काम विद्यापीठात, तर काही अद्ययावत प्रात्यक्षिके पुण्यातील एनसीसीएस, एनसीएल आणि आयआयटी, मुंबई येथे केली. या संशोधनासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले; तर विद्यापीठ अनुदान आयोग, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत निधीच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाले.
प्रश्न : संशोधनातून तयार झालेले औषध कसे आहे?उत्तर : सध्या उपलब्ध असलेल्या पारंपरिक आयुर्वेदिक औषधांवर संशोधन सुरू केले. माझ्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केलेल्या ११ पैकी नऊ विद्यार्थ्यांनी ‘मधुमेह’ या आजाराशी संबंधित संशोधन केले आहे. सध्या सहा विद्यार्थी त्याच अनुषंगाने अभ्यास करीत आहेत. यातून मिळालेल्या निष्कर्षांतून आम्ही औषधनिर्मितीच्या संशोधनाबाबत एक-एक पाऊल पुढे टाकत गेलो. अखेर विविध १४ झाडांपासून बनविलेल्या या औषधामध्ये अनेक उपयुक्त घटक सापडले. यात स्वादूपिंडाला अधिक इन्सुलीन तयार करायला मदत करणारे, इन्सुलीनप्रमाणे काम करणारे आणि रक्तातील साखर घटविणारे, शरीरात उपलब्ध असलेल्या इन्सुलीनची क्षमता वाढविणारे, आदी घटकांचा समावेश आहे. एकाच वेळी मधुमेहातील अनेक त्रासदायक घटकांना प्रतिबंध करण्याची क्षमता या औषधामध्ये आहे. आम्ही संशोधनातून साकारलेल्या औषधात सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर आयुर्वेदिक औषधांत असलेल्या कारले, जांभूळ, कडूनिंब, अशा घटकांचा समावेश नाही.
प्रश्न : या आयुर्वेदिक औषधाचा परिणाम कसा झाला?उत्तर : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, ती साखर शरीरातील प्रथिनांना जोडली जाते. ज्यामुळे प्रथिनांचे कार्य विस्कळीत होते. त्यातून पुढे किडनी, डोळे, आदींवर परिणाम करणारी सेकंडरी कॉम्पिलिकेशन्स सुरू होतात. ती रोखणारी प्रोटीन ग्लायकेशन इनबिटर्स आमच्या औषधामध्ये आहेत. या औषधाच्या प्राण्यांवर करावयाच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. मानवांवरदेखील चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्लायकेटेड एचबी कमी झाल्याचे आढळून आले. या चाचणींमध्ये सहभागी झालेल्या बहुतांश लोकांनी हे औषध घेतल्यानंतर आळस, थकल्यासारखे वाटणे, उत्साह कमी होणे, हातापायांची होणारी जळजळ या स्वरूपातील त्रास पूर्णपणे बंद झाल्याचे सांगितले. हे औषध टॅबलेट स्वरूपात आणि कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. विद्यापीठ पातळीवर होणारे संशोधन हे केवळ प्रबंधापुरते राहू नये. ते समाजापर्यंत जावे, या उद्देशाने विद्यापीठामार्फत या औषधांचे तंत्रज्ञान लवकरच औषधनिर्मिती कंपनीला हस्तांतरित केले जाणार आहे.
प्रश्न : पुढील संशोधनाचा टप्पा कसा राहणार आहे?उत्तर : या आयुर्वेदिक औषधाच्या आता अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी विद्यापीठानेडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे. मधुमेहग्रस्त, मधुमेहपूर्व आणि नियंत्रित अशा तिन्ही प्रकारच्या सुमारे शंभर रुग्णांवर पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यांच्यावरील औषधांच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यानंतर संबंधित औषधाचे तंत्रज्ञान हे नित्यम दीपकम या औषधनिर्मिती कंपनीला हस्तांतरित केले जाईल. या औषधाच्या संशोधनामुळे शिवाजी विद्यापीठाची संशोधनात एक नवी ओळख निर्माण झाली आहे. शिवाय विद्यापीठाने संशोधनाचा प्रत्यक्ष वापराच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. मधुमेहाचे टाईप वन आणि टाईप टू असे प्रकार आहेत. मधुमेहातील ९० टक्के रुग्ण हे टाईप टूमधील असतात. टाईप वन हा प्रकार अधिकतर लहान मुलांचा दिसून येतो. मधुमेह झाल्याने या मुलांवर अनेक मर्यादा येतात. त्यांना वारंवार इन्सुलीन घ्यावे लागते. त्यांचा हा त्रास कमी होण्यासाठी आयुर्वेदिक औषधनिर्मिती करणे, हा आता आमच्या संशोधनाचा पुढील टप्पा असणार आहे. याअंतर्गत मधुमेहाची सुरुवात नेमकी कशामुळे होते, यावर लक्ष केंद्र्रित करून पहिल्या टप्प्यावर त्याला रोखण्याच्या दृष्टीने संशोधन केले जाणार आहे.- संतोष मिठारी