: आजºयात इंद्रायणी भातखरेदीचा प्रारंभ
आजरा : देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या शेतकऱ्याला शेतीविरोधी कायदे करून गुलाम करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. ते स्वाभिमानी शेतकरी संघटना सहन करणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
आजऱ्यातील इंद्रायणी भात खरेदी शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंद देसाई होते.
भात-खरेदी व चेकचे वाटप राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. कोरोनाने बाजारात मंदी असल्याने व्यापारी भात खरेदीस येत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी संघटनेने २१०० रुपये दराने भाताची खरेदी केली असल्याचे तानाजी देसाई यांनी सांगितले.
प्रक्रिया राबविलेल्या पिकाला चांगला दर मिळतो. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे उद्योजक महादेव पोवार यांनी सांगितले. रस्त्यावरील दुकानामुळे आजरा घनसाळला व्यापाऱ्यांनी गालबोट लावण्याचे काम केल्याचा आरोप राजेंद्र गड्यान्नावर यांनी केला.
कार्यक्रमास अल्बर्ट डिसोझा, सुनील डोणकर, जोतिबा चाळके, बसवराज मुत्नाळे, निवृत्ती कांबळे, तालुकाध्यक्ष इंद्रजित देसाई, कृष्णा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
------------------------------
* सीडलेस करवंदांसाठी संशोधनाची गरज
आजरा व परिसरात मुबलक करवंदे मिळतात. सांगलीतील सीडलेस द्राक्षाप्रमाणे करवंदांवर संशोधन झाल्यास सीडलेस करवंदे मिळतील व शेतकऱ्यांना शेतीबरोबर उदरनिर्वाहाचे साधन होईल, असे कॉ. संपत देसाई यांनी सांगितले.
------------------------------
* देशात फक्त २४ पिकांना हमीभाव
उसाबरोबर कापूस, तूर, भाताला हमीभाव आहे. पण, अनेकवेळा हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळतच नाही. नवीन कृषी कायद्यामुळे उद्योजक हमीभाव ठरवतील व सरकारला सांगतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, असे शेट्टी म्हणाले.
------------------------------
फोटो ओळी : आजरा येथे भातखरेदीचा प्रारंभ करताना माजी खासदार राजू शेट्टी. शेजारी राजेंद्र गड्यान्नावर, मुकुंद देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३०१२२०२०-गड-०१