कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करणार असल्याने त्या पक्षातून विजयी झालेल्या स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे व दीपा मगदूम या महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. कसबा बावड्याने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना भरभरून पाठबळ दिल्याने महापौरपदाची लाल दिव्याची गाडी पहिल्यांदा कसबा बावड्याला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्वाती यवलुजे या स्पर्धेतील प्रबळ दावेदार आहेत.महापौरपद नागरिकांचा मागास वर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. नव्या सभागृहात या प्रवर्गासाठी एकूण ११ प्रभाग आरक्षित आहेत. ‘नागरिकांचा मागास वर्ग’ असा जातीचा दाखला असलेली, कोणत्याही प्रभागातून निवडून आलेली महिला या पदासाठी पात्र ठरते. परंतु भाजप-ताराराणी आघाडी व शिवसेनेची सत्ताच येणार नसल्याने त्यांचा पत्ता कट झाला. राष्ट्रवादी जरी काँग्रेसबरोबर सत्तेत सहभागी होणार असली तरी काँग्रेसच्या महापौर होणार असल्याने या पक्षातून कोण विजयी झाले, यालाच महत्त्व आले. त्यानुसार काँग्रेसकडून तिघी या स्पर्धेत आहेत. त्यामध्ये स्वाती यवलुजे, दीपा मगदूम आणि अश्विनी अमर रामाणे यांचा समावेश आहे. यवलुजे या सामान्य कुटुंबातील महिला आहेत. त्या पोलीस लाईन प्रभागातून रिंगणात आहेत. गतनिवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्यावर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वंदना बुचडे यांना महापौर करून कसबा बावड्याला लाल दिव्याची गाडी नेली. या वेळेलाही काँग्रेसची सत्ता आल्याने यवलुजे यांना संधी मिळू शकेल. त्या प्रभागात तसा प्रचारही झाला होता. राजलक्ष्मीनगर प्रभागातून विजयी झालेल्या दीपा मगदूम या माजी महापौर दिलीप मगदूम यांच्या पत्नी आहेत. मगदूम यांचे नुकतेच निधन झाले. अवघ्या १५ दिवसांत त्यांनी हा विजय खेचून आणला. मगदूम हे ‘सतेज पाटील यांचे खंदे कार्यकर्ते’ होते; शिवाय हा प्रभाग ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये येतो. त्यामुळे त्यांचाही या पदासाठी विचार होऊ शकतो. शासकीय मध्यवर्ती कारागृह या प्रभागातून विजयी झालेल्या अश्विनी रामाणे या काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या स्नुषा आहेत. काँग्रेसच्या राजकारणात रामाणे यांनी सतेज पाटील यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे त्याही तितक्याच प्रबळ दावेदार आहेत. रामाणे यांनी गेल्या सभागृहात काँग्रेसचे कोणतेही पद घेतलेले नाही. त्यामुळे आता आपल्याला संधी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)गंमत अशीही...या निवडणुकीत भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या कन्या श्रुती पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौरपदाचा शब्द दिला असल्याचे सांगणारे प्रकाश मोहिते यांच्या पत्नी यशोदा या दोघीही पराभूत झाल्या. राष्ट्रवादीच्या दावेदार असलेल्या नगरसेविका मृदुला रमेश पुरेकरही पराभूत झाल्या. हसिना बाबू फरास विजयी झाल्या असल्या तरी या पक्षाच्या वाट्याला हे पदच आलेले नाही. शिवसेनेतील दावेदार असलेल्या प्रतिज्ञा निल्ले विजयी झाल्या; परंतु त्यांचा पक्ष हरला.
यवलुजे नव्या ‘महापौर’ शक्य
By admin | Published: November 03, 2015 12:52 AM