कोल्हापूर : विद्यमान महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनील पाटील यांची कारकीर्द १५ मे रोजी संपत असल्याने त्यांच्या रिक्त जागी नवीन महापौर व उपमहापौर यांची निवड २२ ते २५ मे दरम्यान होणार आहे. तशी पूर्वसूचना महानगरपालिका नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी शनिवारी सर्व नगरसेवकांना दिली.या दरम्यान कोणी वैयक्तिक दौऱ्यावर न जाता शहरातच थांबावे, अशी विनंती करण्यात आली आहे. सध्या सभागृहात दोन्ही काँग्रेसचे बहुमत (पान ८ वर) असले तरी भाजप व ताराराणी आघाडीने कांही झाले तरी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा चंग बांधला असल्यामुळे ही निवडीत मोठा राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर यवलुजे व उपमहापौर पाटील यांची कारकिर्द आता केवळ दहा दिवसांची राहिली आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाºयांच्या अनुषंगाने हालचाली गतिमान होताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने पक्षीय वातावरण गरम होत असताना प्रशासकीय पातळीवरही नव्या पदाधिकाºयांची निवडणूक घेण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे.नगरसचिव कार्यालयाकडून महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या तारखांची चाचपणी केली जात आहे. विद्यमान पदाधिकाºयांची पदे रिक्त झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तरतूद कायद्यात असल्यामुळे १५ मे रोजी सायंकाळी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून निवडणुकीची तारीख निश्चित करून द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. दोन दिवस विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांची वेळ घेऊन तारीख दिली जाईल. त्यानंतर चार दिवस आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे २२ ते २५ दरम्यान कोणतीही तारीख निवडणुकीसाठी निश्चित केली जाऊ शकते.
विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग समिती सभापती निवडीवेळी चार नगरसेवक बाहेरगावी तसेच परदेशात गेल्यामुळे अनुपस्थित राहिले होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नगरसेवक कुटुंबासह सहलीवर जाण्याची शक्यता गृहीत धरून नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सर्व नगरसेवकांना शनिवारी महापौर निवडणुकीची पूर्वसूचना दिली. तसेच त्या दरम्यान कोणी बाहेरगावी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.१४ मे रोजी महापालिका सभामहापौर यवलुजे यांच्या कारकिर्दीतील शेवटची सभा १४ मे रोजी होणार आहे. त्याची विषयपत्रिका शनिवारी नगरसचिव कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. याच दिवशी विकासकामांना टाळाटाळ करीत असल्याबद्दल प्रशासनाचा निषेध करून तहकूब केलेली सभाही घेतली जाणार आहे.