गारगोटी : लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असून, नेते हे जनतेचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे साहेब बनून न राहता आपण जनतेचे सेवक आहोत, याची जाणीव ठेवून समाजात विनम्रतेने, सेवाभावी वृत्तीने तसेच परिपूर्ण अभ्यास करून जबाबदारीने काम करा. चांगल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण करा व पक्षाचा मान, सन्मान वाढवा त्याचबरोबर लोकसंपर्क वाढवा, असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.मुदाळ येथील हुतात्मा स्वामी सूतगिरणी सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. प्रमुख उपस्थित कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाचे संचालक बी. डी. भोपळे, आर. बी. देसाई, धोंडिराम वारके होते.के. पी. पाटील म्हणाले, नवनिर्वाचित सदस्यांनी अभ्यासूवृत्ती स्वीकारावी. प्रत्येक यशस्वी महान व्यक्तींची चरित्रे तपासून पाहा. या व्यक्तींनी आयुष्यात शिस्त, अभ्यासूपणा बाळगला म्हणून ते मोठे झाले. तसेच स्वत:ला स्वस्त होऊ देऊ नका. तुमच्याकडे येणाऱ्या लोकांशी सौजन्याने वागा. त्यांची कायम ओळख ठेवा. ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याशी विनम्रतेने वागा. कुठल्याही प्रकारच्या सभा, संमेलने, समारंभ असतील तर त्याला नियोजित वेळेतच हजर राहायला हवे. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुम्हाला कोणते अधिकार प्राप्त झाले आहेत, याचा अभ्यास करा.यावेळी सत्कारमूर्ती जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसभापती विश्वनाथ कुंभार, माजी सरपंच एन. डी. कुंभार, माजी संचालक धनाजीराव देसाई यांच्या वतीने बाळासाहेब भालेकर, आदी पराभूत उमेदवारांनी आपला पराजय का झाला, याचा आढावा आपल्या मनोगतामधून व्यक्त केला.यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक सुनील कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी के.डी.सी.सी. बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, सभापती विलासराव कांबळे, ‘बिद्री’चे माजी संचालक धनाजीराव देसाई, विलास झोरे, जिल्हा परिषद माजी सदस्य ईश्वरा डाकरे, माजी सरपंच के. ना. पाटील, शेखर देसाई, शिवाजी देसाई, आर. के. पाटील, आर. के. देसाई, शिवाजी देसाई, आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीत पराजित झालेले उमेदवार उपस्थित होते. माजी सभापती बापू आरडे यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी)
नूतन सदस्यांनी लोकसंपर्क वाढवा
By admin | Published: March 16, 2017 12:27 AM