इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग उद्योगामधील कामगारांसाठी शासनाने नवीन किमान वेतन जाहीर केले आहे. यानुसार कुशल कामगारांना प्रती महिना ६००० रुपये, अर्धकुशल कामगाराला ७००० रुपये व अकुशल कामगाराला ८००० रुपये अशी वाढ मिळेल. ही अधिसूचना उद्योग-ऊर्जा व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सादर केली असल्याची माहिती याचिकाकर्ते लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने ए. बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांना जानेवारी १९८६ नंतर गेली २८ वर्षे शासनाने किमान वेतन जाहीर केलेले नव्हते. लालबावटा कामगार संघटनेसह अनेक संघटनांनी किमान वेतनासाठी वारंवार आंदोलने केली. न्याय मागण्यासाठी वेगवेगळ््या पातळीवर त्याचा पाठपुरावा झाला. अखेर कामगार संघटनेतर्फे ए. बी. पाटील यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची न्यायाधीश मोहीम शहा व कुलाबावाला यांच्यासमोर ४ जानेवारीला सुनावणी झाली. यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रकरणी ३१ जानेवारीपूर्वी शासनाने अधिसूचना काढावी आणि पुढील सुनावणीसाठी २ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावे, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केला.न्यायालयाच्या आदेशानुसार उपसचिव दि. सा. रजपूत यांनी उपरोक्त अधिसूचना २९ जानेवारीला किमान वेतन अधिनियमास अनुसरून जारी केल्याचे पाटील यांना सांगितले. कामगार संघटनेच्यावतीने अॅड. प्रसन्न कुमार व अक्षय पाटील यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेसाठी कामगार नेते दत्तात्रय माने, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोणाला किती लाभ शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार कुशल कामगाराला महापालिका क्षेत्रात १०,१०० रुपये, नगरपालिका क्षेत्रात ९,५०० रुपये व ग्रामीण क्षेत्रात ८,५०० रुपये इतके मूळ वेतन जाहीर झाले असून, सन २००१ चा महागाई भत्ता १०० निर्देशांक गृहीत धरून पुढे वाढीव निर्देशांकाप्रमाणे भत्त्यात वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सध्या मूळ पगारात ३,७७० रुपये इतकी वाढ होईल. अशाच प्रकारे अर्धकुशल कामगाराला वरील उल्लेखनीय क्षेत्रानुसार अनुक्रमे ९,५०० रुपये, ९००० रुपये व ८००० रुपये आणि अकुशल कामगाराला अनुक्रमे ९००० रुपये, ८००० रुपये व ७५०० रुपये इतका दरमहा पगार आठ तास पाळीच्या कामासाठी मिळणार आहे. सध्या या कामगारांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत असून, कुशल कामगारांना सुमारे ६००० रुपये, अर्धकुशल कामगारांना ७००० रुपये, तर अकुशल कामगारांना ८००० रुपये इतकी दरमहा वाढ मिळेल. मात्र, या नवीन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटनांना आंदोलन करावे लागेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
यंत्रमाग कामगारासाठी नवे किमान वेतन
By admin | Published: February 03, 2015 11:38 PM