कोल्हापूर : स्टेट बँक इंडियाने (एसबीआय) ‘यू ओन्ली नीड वन’ (योनो) हे नवे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. बँकेच्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरणारे आहे. कोल्हापुरातील ग्राहकांना या अॅपबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम बँक आणि केआयटी महाविद्यालयातर्फे सोमवार (दि. ११) पासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एसबीआय’चे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप देव आणि ‘केआयटी’ ‘आयएमईआर’चे संचालक डॉ. सुजय खाडिलकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.क्षेत्रीय प्रबंधक देव म्हणाले, या मोबाईल अॅपद्वारे खाते उघडणे, पैसे काढणे, भरणे, पैसे दुसऱ्याला पाठविणे, कर्ज मिळविणे, आदी प्रक्रिया करता येणार आहे. विविध सेवा-सुविधा पुरविणाऱ्या, वस्तूंची विक्री करणाऱ्या ८५ कंपन्यांसमवेत ‘एसबीआय’ने करार केला आहे. या कंपन्यांची सुविधा अॅपमध्ये असणार आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत बँकेच्या सर्व ग्राहकांसाठी या अॅपची सुविधा उपलब्ध होईल.शेतकऱ्यांसाठी अॅप उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोल्हापूरमधील ग्राहकांना या अॅपची माहिती व्हावी यासाठी सोमवार (दि. ११) ते बुधवार (दि. १३) दरम्यान मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दसरा चौकातील ‘एसबीआय’च्या शाखेपासून रॅलीने होईल.
रॅलीचे उद्घाटन बँकेच्या पुणे विभागाचे उपमहाव्यवस्थापक अबिदउर रहेमान यांच्या हस्ते होईल. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, सीपीआर चौक असा रॅलीचा मार्ग आहे. डॉ. खाडिलकर म्हणाले, केआयटीमधील एमबीए, एमसीएचे १०० विद्यार्थी हे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या अॅपची ग्राहकांना प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत. पत्रकार परिषदेस प्रा. रंजना शिंदे उपस्थित होत्या.
एका दिवसात चेकचे क्लिअरिंगकोल्हापूर आणि सांगलीमध्ये बँकेच्या एकूण ५७ शाखा कार्यान्वित आहेत. या सर्व शाखांमध्ये सीटीएस चेकचे (धनादेश) एका दिवसात क्लिअरिंगची (समाशोधन) सुविधा उपलब्ध झाली असल्याचे देव यांनी सांगितले.