कोल्हापूर : बॉम्बे नर्सिंग होमकायद्यातील अनेक अटी या डॉक्टरांसाठी जाचक असून, याबाबत फेरविचार करण्याची मागणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे शुक्रवारी केली.या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहावर आबिटकर यांची भेट घेऊन त्यातील अनेक तरतुदी या डॉक्टरांसाठी कशा जाचक आहेत हे सोदाहरण स्पष्ट केले. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर इतक्याच आकाराचे हवे, रुग्णांसाठी बसण्यासाठी इतकी जागा आवश्यक आहे अशासारख्या अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.परंतु गेली ३०/४० वर्षे ज्यांचे दवाखाने जुने आहेत त्या ठिकाणी आता पुन्हा नूतनीकरण करणे खर्चिक आणि अडचणीचे आहे. अशा रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा करून घेतल्या असताना पुन्हा नव्याने त्या करून घेणे परवडणारे नाही. नवीन रुग्णालयांसाठी एकवेळ अशा पद्धतीचे नियम परवानगी देण्याआधी लावता येतील. परंतु जुन्यांना या अटी त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.एसटीपी प्लांटची सक्तीही त्रासदायक असून, अशा नियमांवर बोट ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी कारवाईची भीती घालत असल्याच डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा अशी कोणतीही तातडीने कारवाई होणार नसल्याची ग्वाही आबिटकर यांनी दिली. नर्सिंग स्टाफची एकीकडे मोठ्या प्रमाणावर गरज असताना, असा स्टाफ आता विदेशाकडेही मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असताना रुग्णालयातील अनुभवी स्टाफऐवजी प्रशिक्षित पदवी, पदविकाधारक स्टाफचा आग्रहही असाच जाचक असल्याचे सांगण्यात आले. यासह अनेक अडचणी असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. शिष्टमंडळात डॉ. उदय पाटील, डॉ. राजेंद्र अभ्यंकर, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. अरुण धुमाळ, डॉ संदीप साळोखे, डॉ. निरंजन शहा यांचा समावेश होता.
राज्यपातळीवर बैठक घेण्याचे आश्वासनडॉक्टरांकडून या अडचणी समजावून घेतल्यानंतर मंत्री आबिटकर यांनी याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संघटनेचे राज्यपातळीवरील पदाधिकारी यांची सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले. डॉक्टरांना त्रासदायक ठरणाऱ्या अटी न घालता त्यांना वैद्यकीय उपचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठीची व्यवस्था उभी करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिले.