कोल्हापूर : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या निर्देशानुसार अटींसह नव्या दरपत्रकानुसार जानेवारी महिन्यापासून केबल प्रक्षेपणासाठी पॅकेजची नोंदणी सुरूआहे; परंतु अद्याप ३० टक्के लोकांनीच केबलची नवीन पॅकेज घेतली आहेत. याबाबत ग्राहकांमध्ये अनास्था असून, विविध कारणे सांगून त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे केबलचालकांची घालमेल वाढली आहे.
‘ट्राय’ने एमआरपी अॅक्टअंतर्गत नव्याने केबल दर निश्चित करून ग्राहकांनाच प्लॅन निवडण्याची मुभा देण्याचे धोरण जाहीर केले आहे. जानेवारी महिन्यापासून याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवीन धोरणामुळे केबलच्या चॅनेल पॅकेजसाठी ग्राहकांना २५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात बी न्यूज व एस न्यूजचे मिळून सुमारे साडेसहा लाख केबल कनेक्शनधारक आहेत. यामध्ये बी न्यूजचे सुमारे पाच लाख, तर एस न्यूजचे दीड लाख कनेक्शनधारक आहेत. यातील अद्याप ३० टक्केच म्हणजे सुमारे २ लाख लोकांनीच नवीन पॅकेज घेतले आहे. जानेवारीपासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे हे चित्र आहे.सरकार नियम बदलणार असून, पूर्वीप्रमाणेच केबल सुरूराहणार आहे, या भरवशावर अजून ग्राहक आहेत. तसेच दहावीसह शालेय परीक्षा सुरूअसल्याने मुलांची अडचण नको म्हणूनही ग्राहकांकडून केबलचे पॅकेज घेण्याकडे कानाडोळा केला जात आहे. केबलचालकांकडून भेटीगाठी घेऊन नवीन पॅकेजसंदर्भात माहिती दिली जात असली, तरी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जुन्या केबलचे प्रक्षेपण हे ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे; परंतु या केबलवर पे चॅनेल दिसत नसून, केवळ चार ते पाच राष्टÑीय चॅनेल्स दिसत आहेत. परीक्षेचे कारण पुढे करत ग्राहकांकडून होत असलेला कानाडोळा केबल चालकांची मात्र घालमेल वाढवीत आहे. साधारण एप्रिलअखेरपर्यंत असेच चित्र राहण्याची स्थिती आहे.
केबलचे नवीन पॅकेज घेण्याबाबत ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. परीक्षांसह विविध कारणे सांगून ग्राहकांकडून चालढकल केली जात आहे. ‘ट्राय’च्या धोरणानुसार ३१ मार्चपर्यंत नवीन पॅकेज ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.- प्रकाश महाडिक, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केबल आॅपरेटर संघटना.केबलची पूर्वीची एका रकमेत सर्व चॅनेलची पद्धत सोईस्कर व किफायतशीर होती; परंतु नव्याने आलेल्या पॅकेज पद्धतीमुळे ग्राहकांच्या चॉईसवर गदा आली आहे. जादा पैसे आणि मर्यादित चॅनेल अशी ही पॅकेज पद्धत ग्राहकांसाठी सोईस्कर दिसत नाही.- उत्तम पाटील, केबल ग्राहक