इचलकरंजी : नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली असतानाच शहरातील राजकीय पक्ष आणि आघाड्या सक्रिय झाल्या आहेत. दोन्ही कॉँग्रेस आणि शहर विकास आघाडीतील काही प्रमुखांना घेऊन मॅँचेस्टर आघाडीची स्थापना होत आहे. तर नेतृत्वात नव्याने खांदेपालट करीत शहर विकास आघाडीची सुद्धा पुनर्बांधणी केली जात आहे. प्रभाग रचना व त्यातील आरक्षणे जाहीर झाल्यावर उमेदवारांची चाचपणी सुरू होईल. मात्र, नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती घोषित होताच या हालचालींना वेग येणार आहे.सन २०११ मधील जनगणनेप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे इचलकरंजीतील नगरसेवकांची संख्या ५७ वरून ६२ झाली आहे. कॉँग्रेस पक्षाचे शहरभर जाळे आहे, तर शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही कॉँग्रेसमधील स्वतंत्र विचारसरणीचे प्रमुख, भाजप, शिवसेना, जनता दल, आदींचा समावेश आहे. त्यामुळे कॉँग्रेस व ‘शविआ’ यांना शहरात आवश्यक असलेले उमेदवार मिळविणे अवघड जात नाही. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस हा वेगळा पक्ष असला तरी त्यांनी सन २०११ मधील पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. त्यावेळी त्यांची सर्व उमेदवार मिळविण्यासाठी दमछाक झाली होती.अशा पार्श्वभूमीवर कॉँग्रेस व शहर विकास आघाडी यांच्यातील नाराजांना एकत्रित करून मॅँचेस्टर आघाडीची नव्याने स्थापना होत आहे. मॅँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके असून, चंद्रकांत शेळके उपाध्यक्ष व प्रकाश मोरबाळे सचिव आहेत. तर शहर विकास आघाडीमध्ये खांदेपालट होत असून, आघाडीच्या अध्यक्षपदी अजित जाधव यांना संधी देण्यात आली असून, दिलीप मुथा उपाध्यक्ष, विलास रानडे सचिव व सुनील महाजन खजिनदार आहेत. या दोन्ही आघाड्यांची नोंदणी आॅगस्ट महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. शहर विकास आघाडीची खांदेपालट करताना त्यामध्ये भाजपचे माजी शहर अध्यक्ष विलास रानडे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘शविआ’ चे सर्वेसर्वा आमदार सुरेश हाळवणकर यांच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे काही जागा कमळाच्या चिन्हावर लढविण्यात येऊन उर्वरित ठिकाणी शहर विकास आघाडीचे उमेदवार उभे केले जातील, अशी राजकीय क्षेत्रात चर्चा आहे. (प्रतिनिधी)अस्तित्व स्वतंत्र ठेवूनच वाटाघाटी : चाळकेआवाडे व हाळवणकर यांना वगळून मॅँचेस्टर आघाडीची स्थापना करण्यात येत असली तरी शहर विकास आघाडीने युती करण्यासाठी संधी दिल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती मॅँचेस्टर आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सागर चाळके यांनी दिली. कॉँग्रेसने आॅफर दिल्यास त्याचा सुद्धा आपण विचार करू. मात्र, दोघांबरोबरही चर्चा करताना मॅँचेस्टर आघाडीचे अस्तित्व स्वतंत्र राहील, ही अट राहणार आहे.... तर शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्वशिवसेना हा पक्ष शहर विकास आघाडीचा घटक असला तरी राज्य पातळीवर भाजप व शिवसेना यांच्यात चाललेल्या वादाच्या निर्णयावर ‘शविआ’मध्ये राहायचे की नाही, हे अवलंबून असणार आहे. विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे स्वतंत्र अस्तित्व राहिल्यास इचलकरंजीत शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे सांगण्यात येते.
इचलकरंजीत नवीन राजकीय जोडण्या
By admin | Published: June 28, 2016 9:05 PM