दत्ता बिडकरहातकणंगले : विधानसभा निवडणुकीमुळे तालुक्याच्या राजकारणात महायुती आणि घटक पक्षच्या एकजुटीने नवी राजकीय समीकरणे उदयाला आली आहेत. अपयशाने खचून न जाता पाच वर्षे मतदारसंघात संपर्क ठेवून जनसुराज्यचे अशोकराव माने यांनी चार पक्षाची एकसंघ मोट बांधून विजय मिळवला. महाविकास आघाडी कागदावरच भक्कम होती, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे नेते प्रचारात नव्हते. काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर एकाकी झुंज देत विकासाच्या मुद्दावर निवडणूक लढवली. मात्र, नियोजनातील चूक व प्रमुख कार्यकर्त्यांची वाणवा असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.लोकसभेपाठोपाठ विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारल्याने संघटना आता चळवळी पूरती शिल्लक राहिल्याने त्यांच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मतदारसंघात जातीय समीकरणाला फाटा देत कार्यकर्त्यांनी नेत्याच्या आदेशानुसार काम केल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याचे यावेळी दिसून आले.महायुती आणि महाविकास अशी सरळ विभागणी या निवडणुकीत दिसून आली. महायुतीचे नेते, त्यांचे कार्यकर्ते एक संघ मतदारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, महाडीक गट, यड्रावकर गट या नेत्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश देत आपआपल्या गावात अशोकराव माने यांना मताधिक्य मिळाले तरच भेटायला यायचे, असा सज्जड निरोप दिल्याने गावपातळीवर फारसे विरोधात काम झाले नाही. जिल्हा बँक संचालक विजयसिंह माने, डॉ. नीता माने, सुहास राजमाने यांच्या जोडण्या यशस्वी ठरल्या. गावोगावच्या नियोजनाप्रमाणे कार्यकर्ते उद्दिष्टा पर्यंत पोहोचल्याने जनसुराज्यचा मोठा विजय झाला.महाविकास आघाडीचे शेवटच्या दोन दिवसातील नियोजन चुकल्याने कार्यकर्ते नाराज झाले. उद्धवसेनेचे मोजके निष्ठावंत शिवसैनिक सोडले तर इतरांनी काँग्रेसला साथ दिली नाही. शरद पवार गटाची भक्कम साथ मिळाल्याचे जाणवले नाही. काँग्रेस पक्षाने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली. आमदार राजूबाबा आवळे गावागावांमध्ये अनेक विकासकामे केली. विविध समाजांना निधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी केलेली विकासकामे पटवून देण्यात स्थानिक कार्यकर्ते कमी पडले.माजी खासदार जयवंतराव आवळे, संजय आवळे, वडगावच्या माजी नगराध्यक्षा विदयाताई पोळ, माजी आमदार राजीव आवळे, भगवान जाधव, शशिकांत खवरे यांनी एकाकी खिंड लढवली. अंबपचे राजवर्धन पाटील यांनी सगळ्या जोडण्या यशस्वी लावल्या. मात्र काँग्रेस बरोबर मित्रपक्ष एकसंघ राहिला नसल्याने आवळे यांना अपयश आले.राजूबाबा आवळे यांनी केलेल्या विकासकामापेक्षा लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना, कृषी पंप वीज सवलत, यासह शासनाच्या योजना प्रभावी ठरल्याने महायुतीच्या उमेदवाराची जमेची बाजू ठरल्या. युवक, लाडक्या बहिणी केंद्र स्थानी राहिल्या. शेतकरी, ओबीसी समाज महायुती बरोबर राहिला. तर दलित, मुस्लिम मताचे धुव्रीकरण झाल्याचे वातावरण होते. त्याचा देखील फटका राजू आवळे यांना बसलाजनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने यांना ५७ पैकी ५४ गावात मताची आघाडी मिळाली, हूपरी ९२११, पेठवडगाव ८६५०, शिरोली ८५७४, पट्टणकोडोली ६७२२, रेंदाळ ५८८९, रुकडी ४३९६, हातकणंगले ३८७८, आळते ३४४५, भादोले ३४१५ या मोठया गावांनी माने यांना मोठे मताधिक्य दिले.
तीन गावात आघाडीकाँग्रेसचे राजू बाबा आवळे यांना ५७ पैकी किणी, नरंदे, आणि माणगांववाडी या तीन गावांत मताधिक्य मिळाले. मात्र ते ही नगण्य होते. स्वाभिमानीच्या डॉ. सुजित मिणचेकर यांना ११ गावात तीनअंकी मते देखील मिळाली नाहीत. हिंगणगांव आणि मजले या दोन गावात त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली. त्यांच्या मिणचे गावातही त्यांना तिसऱ्या नंबरची मते मिळाली.
अंबप केंद्रस्थानीहातकणंगलेची मतदारसंघाची निवडणूक असली तरी निवडणुकीचा केंद्रबिंदू अंबप गाव ठरले. जनसुराज्य शक्तीच्या जोडण्या विजयसिंह माने यांच्याकडे होत्या. तर काँग्रेस पक्षाच्या जोडण्या राजवर्धन पाटील हे लावत होते. या दोन नेत्यांमधील टोकाची स्पर्धा यावेळी पाहावयास मिळाली. निवडणूक आमदारकीची आणि हालचालीचे केंद्र मात्र अंबप असे चित्र होते.
१३ गावांत मोठे मताधिक्य आवाडे गटाच्या जुन्या मतदारसंघातील १३ गावांमध्ये २०१९ला अशोकराव माने यांना ६९०० मते मिळाली होती. यावेळी १३ गावांत ४०७१८ इतकी मते मिळाली. या १३ गावातून १७२२७ चे मताधिक्य मिळाले. प्रकाश आवाडे यांच्या दमबाजीने काम हे काम फत्ते झाले. राजूबाबा आवळे यांचे गणित या १३ गावांमध्येच फसले.