लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : घरेलू कामगारांची नवीन नोंदणी करून त्यांना कोरोनामधील अनुदान व इतर योजनांचा लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन सर्व श्रमिक संघाने कोल्हापूर येथे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.
निवेदनात, राज्य शासनाने असंघटित कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सन २०१४ पर्यंत घरेलू कामगारांना योजनांचा लाभ व सन्मानपत्र दिले होते. मात्र, नंतरच्या कालावधीत नवीन नोंदणी व नोंदणीकृत कामगारांना योजनेचा लाभ देण्यात आला नाही. कोरोनाच्या काळातही हे कामगार जीव धोक्यात घालून काम करीत होते. शासनाने नोंदणीकृत कामगारांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. परंतु ती रक्कम तुटपुंजी असून, ती सात हजार ५०० रुपये करावी. तसेच सन २०१४ पासून बंद असलेली नोंदणीची प्रक्रिया पुन्हा पूर्वीच्या व नवीन नोंदणीकृत कामगारांना कोविड अनुदानासह इतर योजनांचा लाभ द्यावा. त्याबाबतचे आदेश येथील सहायक कामगार आयुक्तांना द्यावेत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात अतुल दिघे, नयना सावंत, धोंडीबा कुंभार, कविता पाटील, सरिता बेळवी, आदींचा समावेश होता.