कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल मार्चपर्यंत खुले करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी ‘लोकमत’च्या कार्यक्रमात केली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानसेवेने, तर कोल्हापूर देशातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई सेवेने कसे जोडले जाईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘लोकमत’च्या वतीने ‘आयकॉन्स ऑफ कोल्हापूर’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन व समाजाच्या विविध क्षेत्रांतील ४२ आयकॉन्सचा शानदार सत्कार सोहळा येथील हॉटेल सयाजीमध्ये झाला. यावेळी शाहू छत्रपती, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे, लोकमत एडिटोरिअल बाेर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत’ कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष मकरंद देेशमुख उपस्थित होते.
देशातील २० कोटी लोक आता वर्षाला हवाई प्रवास करतात. ही संख्या २०३० पर्यंत ४० कोटींवर नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर, सिंधुदुर्गातील चिपीपासून ते बिहारमधील दरभंगासारखे विमानतळही देशाच्या विमानसेवेेशी कसे जोडले जाईल, यासाठी माझे प्रयत्न आहेत, असेही शिंदे म्हणाले.
‘लोकमत’चे कौतुक : या कार्यक्रमात ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाचे कौतुक केले. शिंदे परिवार आणि कोल्हापूरचे जुने संबंध उलगडून शिंदे म्हणाले, माझ्यासाठी हा भावुक क्षण आहे. आमच्या तीन पिढ्या दर्डा परिवाराशी जोडलेल्या आहेत. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रयत्नांतून ‘लोकमत’ने विश्वासार्हता निर्माण करून महत्त्वाचे योगदान दिले आहे.
शिंदे आणि मुख्यमंत्रिपद...ज्योतिरादित्य शिंदे हे लोकांमध्ये मिसळणारे दिलदार, खानदानी, राजकारणी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे शिक्षण परदेशात झाले असले तरी त्यांची भाषा मराठीच आहे. मराठी मातीशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असे मी म्हणणार नाही; पण त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेच; शिवाय देशाचे नेतृत्व करण्याचीही धमक त्यांच्यामध्ये आहे, असे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहून सुचविले. त्यावर मंत्री पाटील यांनी महाराष्ट्रातही सध्या शिंदेच मुख्यमंत्री असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला.