कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन विभाग, कोल्हापूर यांच्याकडून खासगी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एमएच ०९ - एफई याची मुदत शनिवारी संपुष्टात येत आहे. सोमवार (दि. ६) पासून नव्याने दुचाकी वाहनांची नोंदणी मालिका एमएच. ०९ - एफएफ अशी सुरू होत आहे.
नव्याने पसंती क्रमांकांचे अर्ज सोमवारी (दि. ६) सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत. याची जिल्ह्यातील सर्व खासगी दुचाकी वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.लिलाव पद्धतीने वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करताना पुढीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत आवश्यक रकमेचा धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने मंगळवारी (दि. ७) जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत कार्यालयात जमा करावा. त्यानंतर त्याचा लिलाव त्याच दिवशी दुपारी चार वाजता करण्यात येईल.
लिलावाच्या वेळी अर्जदार व प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित राहणाऱ्यांकडे त्यांचे प्राधिकारपत्र व ओळखपत्र असणे आवश्यक आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी कळविले आहे.