गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे प्राचार्य द. गो. दसनूरकर यांनी लिहिलेला दहा खंडातील ‘आपले महाभारत’ हा ग्रंथ १९७० च्या दशकात अतिशय लोकप्रिय ठरला. मानवी जीवनाचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न प्राचार्य दसनूरकर यांनी या ग्रंथात केला आहे. प्राचार्य दसनूरकर यांनी लिहिलेला ‘आपले महाभारत’ हा ग्रंथ म्हणजे संस्कृत महाभारताचा जसाच्या तसा अनुवाद किंवा भाषांतर नाही, तर व्यास महर्षींच्या अगाध प्रज्ञेचे ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून दर्शन घडविण्याचा अभिनव प्रयत्न आहे. साहजिकच या ग्रंथाला एका विशाल ज्ञानकोशाचे रूप प्राप्त झाले आहे आणि आजच्या कित्येक समस्या सोडविण्यासाठी किंवा संकटकाळी मार्गदर्शनासाठी ‘आपले महाभारत’ या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो. ग्रंथराजाच्या या वैशिष्ट्यांमुळेच त्याची आवृत्ती नव्याने प्रकाशित केली जावी असा अनेक जाणकारांचा आग्रह होता म्हणूनच तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे ऋतुपर्ण शशिकांत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
‘आपले महाभारत’ची नवी आवृत्ती प्रकाशित होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:19 AM