अविनाश कोळी- सांगली -भक्तांची तीर्थक्षेत्र वारी अधिक सुलभ व सेवा-सुविधांनीयुक्त व्हावी, यासाठी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित होते. शासनाने नवे बदल करून फेरप्रस्तावांची सूचना केल्यामुळे तीर्थक्षेत्रांना आता शासनदरबारी एक वारी करावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांची संख्या २८६ इतकी आहे. यामध्ये तालुकानिहाय याद्याही तयार आहेत. मंदिरे, दर्गा, मठ अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा व तीर्थक्षेत्रांना दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात. यात्रा, उरूस व अन्य कार्यक्रमांवेळी अशाठिकाणी हजारो, लाखो भाविकही गोळा होतात. त्यामुळे अशा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे प्रस्ताव यापूर्वी पाठविण्यात आले होते. शासनाने १९ जुलैरोजी नवे परिपत्रक काढून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात मोजके बदल केले. यापूर्वी तीर्थक्षेत्र विकासात क्षेत्राची मर्यादा नव्हती. आता संबंधित तीर्थक्षेत्राच्या २०० मीटर परिसरातच विकासाची योजना आखण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावाचे रंगरुप बदलणार आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रांना या अटीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. जागांची उपलब्धता हा प्रमुख अडथळा यामुळे निर्माण होणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, शौचालये यासह भक्तनिवास व अन्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची उपलब्धता असणे गरजेचे आहे. जागेच्या अडचणीमुळे तीर्थक्षेत्रांच्या प्रस्तावांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने संबंधित गावाचा, शहराचा विकास करण्याची संधी होती. आता ती संधी मिळणार नाही. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना केल्यामुळे अनेक प्रस्तावांची गोची झाली आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासाचे २५ कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव शासन मंजूर करू शकते. निधीची उपलब्धता अधिक असल्याने ती एक जमेची बाजू ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांसाठी राहणार आहे. कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील काही तीर्थक्षेत्रांचे प्रस्ताव आम्ही यापूर्वी पाठविले आहेत. ते प्रलंबित आहेत. नव्या सूचनांप्रमाणे आता नवे प्रस्ताव पाठवून जास्तीत-जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लवकरच याबाबतचा आढावा आम्ही घेऊ. - संजयकाका पाटील, खासदार, सांगलीवाळवा तालुक्यात सर्वाधिक ठिकाणेवाळवा तालुक्यात सर्वाधिक ४१ तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांची नोंद आहे. सर्वात कमी ठिकाणे आटपाडी तालुक्यात आहेत. अ, ब आणि क अशा तीन वर्गात तालुकानिहाय तीर्थक्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्रापर्यंत जाणारे रस्ते, पाणीपुरवठा, शौचालये, वाहनतळ, भक्तनिवास, संरक्षण भिंत, विद्युतदिवे अशा कामांचा समावेश आहे.
सांगलीच्या तीर्थक्षेत्र विकासाची नवी वारी
By admin | Published: August 18, 2016 11:34 PM