कोल्हापूर : साहित्य व चित्रपट या दोन्ही क्षेत्रांची माध्यमे, भाषा निराळी आहे; परंतु दोन्हींचा आशयबिंदू एकच असतो. सर्वांगांनी जीवनाचा वेध घेत, समाजदर्शन, स्वभाववैशिष्ट्ये, नाती, सुख, सुखाचे पदर उलगडणारे साहित्य व चित्रपट या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा सूर सोमवारी मुक्तसंवादात पाहावयास मिळाला. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे राजर्षी शाहू स्मारक येथे पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (किफ्फ) मध्ये मुक्तसंवाद रंगला. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. राजन गवस, प्रा. कृष्णात खोत, ज्येष्ठ पटकथाकार सुमित्रा भावे, चंद्रकांत जोशी यांनी सहभाग घेतला.डॉ. गवस म्हणाले, चित्रपट निर्मितीतून कल्पित रचनेचे दर्शन घडते. चित्रपट व साहित्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यामुळे लेखक किंवा दिग्दर्शक यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा फरक करणे योग्य नाही. साहित्याचे माध्यमीकरण होताना लेखकाला समाजाप्रती द्यावयाचा संदेश नीट पोहोचतो की नाही, ते पाहणे महत्त्वाचे आहे. साहित्यकृतीवर आधारित सिनेमामुळे पुस्तकांच्या विक्रीत वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भावे म्हणाल्या, साहित्याला अभिजात दर्जा आहे, स्थान आहे. त्यामानाने चित्रपट अजूनही बाल्यावस्थेत आहे. अनेकदा प्रसिद्ध कादंबरीवर निघालेला चित्रपट प्रभाव पाडू शकत नाही; क ारण कादंबरीतील पात्रे, पोशाख, कथेचा पोत वाचक मनात तयार करीत असतो; पण चित्रपट पाहताना त्याला आपल्या मनात तयार असलेली कल्पना चित्रपटात सापडतेच, असे होत नाही. साहित्य हे शब्दातून तयार होते; परंतु चित्रपटातील शांततेची ताकद जास्त प्रभावी असते. साहित्यकृतीच्या निर्मितीत फक्त एका लेखकाचा सहभाग असतो; तर चित्रपट ही सामूहिक कला आहे. चित्रपटाच्या निर्मितीवेळी ठोस भूमिका घ्यावी लागते; परंतु लेखक कपोलकल्पित जग निर्माण करतात. कृष्णात खोत म्हणाले, साहित्य व चित्रपट हे परस्परपूरक आहेत. कथेशिवाय सिनेमा पूर्णत्वास जाऊ शकत नाही. बऱ्याच साहित्यकृतींतून चित्रपटाची निर्मिती करणे अशक्य असते; तर एखाद्या सिनेमावरून एखादी कादंबरी वा कथा लिहावी, अशी प्रेरणा लेखकाला मिळू शकते. जोशी म्हणाले, ‘कोर्ट’सारखा सिनेमा म्हणजे व्यवस्थेच्या अवस्थेचं चित्रण. त्यात घटना, प्रसंग, कथा नाही; तरीही तो ठरतो. सिनेमात साहित्यातील जाणिवा उभ्या करता आल्या नाहीत तर सिनेमा फसतो. मुक्त संवादाचे आयोजन‘किफ्फ’अंतर्गत आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ‘भारतीय स्वातंत्र्यात चित्रपटांचे योगदान’ या विषयावर मुक्त संवाद होणार आहे. कार्यक्रम मोफत असून, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. महोत्सवात आज या चित्रपट, लघुपटाचे सादरीकरणचित्रपट स्क्रीन १ : दुपारी १२ वा. - व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अॅन्ड चॉकलेट (मराठी), दुपारी २.३० वा.- ट्रॅव्हलर (इराण), सायंकाळी ६.३० वा.- सायकल (मराठी), रात्री ९ वा.- डॉ. स्ट्रॅग्लेव्ह आॅर : हाऊ आय लर्न्ड टू स्टॉप वरिंग अॅन्ड लव्ह (युके)स्क्रीन २ : सकाळी १० वा.- अदिम विचार (ओरिया), दुपारी १२ वा.-द हंट (डेन्मार्क), सायंकाळी ६.३० वा. अ क्युब आॅफ शुगर (इराण), रात्री ९.३० वा.- छोटा सिपाही (हिंदी) स्क्रीन ३ : सकाळी ९.३० वा.- आॅल द बेस्ट (क्रोएशिया), दुपारी १२ वा.- द कल्पेबल (जर्मनी), दुपारी २.३० वा.- २००१: ए स्पेस ओडिसी (युके).लघुपट स्क्रीन ३ : सायंकाळी ६.३० वा.- भगतसिंग (२१ मि.), सरोजिनी नायडू (२१ मि.), लोकमान्य टिळक (४१ मि.), द स्पिरीट आॅफ नॅशनॅलिझम (२१ मि.), बेगम हजरत महाल (२१ मि.), शहीद उधमसिंग (२५ मि.).
न्यूझीलंडची बांगलादेशवर ७७ धावांनी मात
By admin | Published: December 27, 2016 12:33 AM