कोल्हापूर : विधि (लॉ) अभ्यासक्रमाच्या परीक्षा या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) परिपत्रकानुसार ऑनलाईन घेण्यात याव्यात, अशी मागणी कोल्हापूर शहर विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष अक्षय शेळके यांनी बुधवारी केली. त्यांनी याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे. अशा स्थितीत प्रत्यक्ष परीक्षा घेतल्यास अव्यवहार्य आणि विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांच्या जिवाशी खेळल्यासारखे होईल. बॅकलॉग, अंतिम वर्ष वगळता इतर विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठांनी त्या-त्या राज्य, परिसरातील स्थितीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबतचे अधिकार हे बीसीआयने दि. १ नोव्हेंबरच्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
प्रायव्हेट ज्युनिअर कॉलेजचे ‘सीईटी’ परीक्षेत यश
कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी परीक्षेत यश मिळविले आहे. त्यात अभिषेक रामचंद्र कुलकर्णी (१०० टक्के), चिन्मय प्रताप गुजर (९९.८५), अथर्व मदन कुलकर्णी (९९.३४), प्रतीक संजय भोसले (९८.५९), साक्षी रघुनाथ भोसले (९७.७८), पीयूष प्रसन्न देशपांडे (९७.४०), हर्ष सतीश कुलकर्णी (९६.८०) यांचा समावेश आहे. अभिषेक कुलकर्णी याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, आदींचे मार्गदर्शन लाभले.