कोल्हापूर : निधर्मीवादामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हिंदूराष्ट्र उभारणीला वेग येईल. पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात असेल, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्याचे समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले.कोल्हापुरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू जनजागृती समितीच्या हिंदू राष्ट्रजागृती सभेत ते बोलत होते. सभेला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. या सभेचे सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाड्ये हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक ॲड. नीलेश सांगोलकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय पाटील, सुधाकर पाटील, मोहन पाटील, चंद्रकांत पाटील, सदाशिव परब, शरदिनी कोरे, शिवाजी मोट्ये यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी शंखनादानंतर स्वाती खाड्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर नारायण जोशी आणि गुरुप्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा रणरागिणी शाखेच्या राजश्री तिवारी यांनी मांडला. मिलिंद धर्माधिकारी आणि भक्ती डाफळे यांनी सूत्रसंचालन केले.सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व सांगणारे क्रांतीकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. समारोपप्रसंगी स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
पुढचा गुढीपाडवा हिंदूराष्ट्रात, मनोज खाड्येंचे मत; कोल्हापुरात झाली हिंदू जनजागृती समितीची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 12:06 PM