कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला आहे. परीक्षार्थीचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी परीक्षांचे पुढील वेळापत्रक आयोगाने लवकर जाहीर करावे. तिसऱ्यांदा परीक्षा पुढे गेल्याने मानसिक ताण वाढणार आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबाबत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, परीक्षार्थींच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या.
तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलल्यायावर्षी राज्यसेवा (सामाईक पूर्व परीक्षा), वनसेवा, अभियांत्रिकी सेवेच्या परीक्षा होणार आहेत. राज्यसेवेची परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. कोरोनामुळे ती १३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यादिवशीच जेईई, नीटची परीक्षा होणार असल्याने आयोगाने राज्यसेवा परीक्षा २० सप्टेंबरला घेण्याचे जाहीर केले. आता कोरोनामुळे पुन्हा पुढे ढकलली आहे.
कोरोनाबाबतची सद्य:स्थिती पाहता २० सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेबाबतही परीक्षार्थीना अनिश्चितता वाटत होती. ती राज्य सरकारने आज निर्णय घेऊन दूर केली. तारखेत वारंवार बदल झाल्याने परीक्षार्थींच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. त्यांचे मानसिक स्वास्थ कायम राहण्यासाठी राज्य सरकारने यावर्षीच्या आणि पुढील वर्षीच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.-शशिकांत बोराळकर,संचालक, युनिक अकॅडमी कोल्हापूर.
परीक्षार्थींची संख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. परीक्षार्थींना अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी आयोगाने परीक्षांच्या पुढील तारखांची लवकरात लवकर घोषणा करणे महत्त्वाचे ठरणार आहे.-जॉर्ज क्रूझ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या परिस्थितीत परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बिघडले होते. परीक्षा पुढे गेल्याने आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणखी वेळ मिळणार आहे.-अरविंद माने,परीक्षार्थी, केर्ले.
आपला जीव वाचला तरच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा पुढे गेली आहे म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासात सैल पडू नये. त्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे. सरकार घेईल त्यावेळी परीक्षा देण्याची तयारी ठेवावी.-राहुल अंगज, परीक्षार्थी, चिमगांव.
परीक्षांच्या तारखेत बदल झाल्याने मानसिक स्वास्थावर निश्चितपणे परिणाम होतो. पूर्वपरीक्षेची की, मुख्य परीक्षेची तयारी करायची, अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आयोगाने पुढील सर्व परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात. कोरोनाची स्थिती असताना कर्नाटक सरकारने गेल्या १५ दिवसांपूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यांचे नियोजन लक्षात घेऊन आपल्या आयोगाने पुढील तयारी करावी.-राजवर्धन पाटील, परीक्षार्थी, हुपरी.