कोल्हापूर / हुपरी : दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयए (राष्ट्रीय तपास संख्या) पथकाने रविवारी पहाटे चारच्या सुमारास रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे घरावर छापा टाकून सुमारे पाच तास घरझडती घेतली. त्यानंतर सख्खे भाऊ असलेल्या दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांना कोल्हापुरात अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांची सुमारे सहा तास कसून चौकशी केली. ‘एनआयए’ मार्फत देशभर छापासत्र सुरू असताना कोल्हापुरातील रेंदाळ परिसरात छापा पडल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली.पहाटे दोनच्या सुमारास ‘एनआयए’च्या वरिष्ठ अधिकार्यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून मदतीसाठी पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने पहाटे चारला रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील सिल्व्हरचे दागिने तयार करणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला. सख्खे भाऊ असलेल्या दोघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले. घरातच बंद खोलीत अधिकाऱ्यांनी दोघां संशयितांशी तासभर कसून चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सुमारे पाच तास त्यांची घरझडतीही घेतली. त्यानंतर दोघा भावांना घेऊन कोल्हापूर शहराजीक अज्ञात ठिकाणी नेऊन सुमारे सहा तास कसून चौकशी केली. चौकशीनंतर त्यांना सूचना देऊन दुपारनंतर सोडून दिले.
कोल्हापूर पोलिसांचे घेतले सहाय्य
‘एनआयए’च्या तीन वाहनांतून १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापासत्र अवलंबले, त्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या दोन वाहनांसह ६ जणांच्या पथकाचे सहाय घेण्यात आले तसेच हुपरी पोलिसांचे पथकही सज्ज ठेवले होते. पहाटे दोन वाजता कोल्हापूर पोलीस मुख्यालयातून ही वाहने रेंदाळच्या दिशेने गेली. ती छापासत्र करून सकाळी साडेदहा वाजता कोल्हापुरात परतली. त्यानंतर अज्ञात ठिकाणी संशयितांना नेऊन त्यांची कसून चौकशी केली.
साध्या गणवेशात अधिकारी
छापासत्र वेळी ‘एनआयए’च्या पथकात पोलीस उपअधीक्षक तसेच पोलीस निरीक्षक दर्जाचे १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात दोन महिला अधिकारीही सहभागी होते. त्याशिवाय कोल्हापूर पोलिसांच्या पथकामध्येही एक सहायक पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अशा ६ जणांचा समावेश होता. विशेष म्हणजे, छापासत्रावेळी सर्वांनी साधा गणवेश केला होता.
अत्यंत गोपनीय कारवाई
छापासत्रापूर्वी ‘एनआयए’च्या पथकातील अधिकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास अचानक कोल्हापूर पोलिसांना फोन करून फौजफाट्याची मागणी केली. त्यानंतर वरिष्ठांची तारांबळ उडाली. ‘एनआयए’ने छापा कुठे टाकायचे ? याची कोल्हापूर पोलिसांना पुसटशीही कल्पना दिली नाही. फक्त दोन वाहनांतून ६ पोलिसांचे पथक मदतीसाठी घेऊन ‘एनआयए’ कोल्हापूर मुख्यालयातून बाहेर पडले. पहाटेच्यावेळी संशयिताचे घर कुठे आहे याची चौकशी न करता ते पथक थेट रेंदाळमधील संशयिताच्या दारातच थांबले. त्यावरून संशयिताच्या घराची अगोदरच काढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘एनआयए’ने ही घटना अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळली.
जमावाने संशयितांचे कार्यालय फोडले
इसिसशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी पहाटे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील एका नगरात छापा टाकून सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही माहिती कळताच संतप्त जमावाने सायंकाळी हे दोघे भाऊ चालवित असलेले लब्बैक फाउंडेशनच्या कार्यालयावर दगडफेक करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले. या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भेट देऊन बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या. संबंधित तरुण हे मूळचे इचलकरंजीचे असून, व्यवसायानिमित्ताने ते हुपरी-रेंदाळमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी लब्बैक फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामाची सुरुवात केली आहे.