निवास पाटीलसोळांकूर : ‘बिद्री’ साखर कारखाना २१८ गावातील ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्यावर रात्रीच्या वेळी केलेली कारवाई एकदम चुकीची असून सूडबुध्दीच्या राजकारणापेक्षा शेतकरी सभासदांच्या हितासाठी काही तरी करता येते का? हे राज्य सरकारने बघावे, अशी टीका ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.ए. वाय. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ साखर कारखाना आमची मातृसंस्था असून या संस्थेवर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहे. शेतकरी, कामगारांसह छोट्या छोट्या व्यावसायिकांचा संसार कारखान्यावर उभा आहे. कारखान्याचा कोणी राजकारणासाठी वापर करत असेल तर ते या परिसरातील शेतकरी सहन करणार नाहीत. कारखान्यात काही चुकीच्या बाबी घडल्या असतील तर योग्य त्या यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करुन त्याचा जाबही विचारला पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारणही नाही. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री उशिरा केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. या कारवाईने ‘बिद्री’ची बदनामी झाली आहे, याला जबाबदार कोण? येथे सत्ता कोणाची आहे यापेक्षा तो कारखाना ६५ सभासदांचा आहे, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे.
Kolhapur: बिद्री कारखान्यावर रात्री केलेली कारवाई चुकीची - ए. वाय. पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 5:44 PM