दत्तात्रय पाटील
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा आणि या विषाणूंची साखळी खंडीत करण्यासाठी ग्रामीण भागातही सतर्कता बाळगली जात आहे.आणूर(ता.कागल)येथिल संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि इतर युवकांनी गावातील वाड्या-वस्तीसह गल्लीतून औषध फवारणी केली.बुधवारी रात्री औषध फवारणी होईपर्यंत सर्वाची दारे बंद करण्यात आली.सर्व रस्ते, गटारी,शाळा इमारत,सार्वजनिक ठिकाणची बाकडी,बगीचा सर्वच ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली.
म्हाकवे येथिल शिवराज्य फौंडेशनच्यावतीने गावात आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून सोडीयम क्लोराईडची फवारणी केली. यासाठी राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,भारत चौगुले, मारुती चौगुले, बाळासाहेब चौगुले, अमित पाटील, विजय पाटील आदी परिश्रम घेत आहेत.तसेच,एनसीसीचे छात्र व स्वयंसेवक सिमाभागातून येणारे चारही रस्ते रोखून गावबंदीला सहकार्य करत आहेत.तसेच, विनाकारण भटकणाऱ्यांना चाप लावत आहेत.ग्रामपंचायतीने बाहेरून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्याच्या लेखी सुचना दिल्या.
दरम्यान, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अवलंबून असणाऱ्या शेती आणि शेतकऱ्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. शेतमजूरांना काम नाही.छोटे मोठे व्यवसाय बंद झाल्याने गरिब कारागीरावर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही न कुरकुरता सर्वजण घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
पद्धत जुनी...लुक नवा
कोणीही पाहुणा घरी आला तर त्याला तांब्याभर पाणी दिले जात.पाहुणाही हात-पाय धुवून घरात येत.काळाच्या ओघात ही पारंपरिक पद्धत बंद होत आली होती. मात्र,कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे ती पद्धत आज गरज बनली आहे. अर्जुनवाडा(ता.कागल)येथिल ग्रामपंचायतीने प्रत्येकाने घरात येताना हात -पाय धुवूनच आत या अशी थेट भितीपत्रक काढून घरा-घरावर लावली आहेत.तर ग्रामस्थांनीही याला पाठबळ देत घरासमोर पाण्याची बादली ठेवली आहे.
म्हाकवे येथे एनसीसीची मुले कोणालाही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू न देता घरी राहण्याचे,तसेच मास्क वापरण्याचे आवाहन करत आहेत.