कोल्हापूर- घरातील सावत्र आई आणि वडिलांच्या जाचाला कंटाळून त्या दोघी बहिणी घरातून बाहेर पडल्या. दोघीही अल्पवयीन... वेळ गुरुवारी रात्री साडेनऊची... कोल्हापुरात मध्यवर्ती बस स्थानक परिसरात त्या भांबावलेल्या अवस्थेत फिरत होत्या. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी त्यांना गाठलेच. (Rickshaw drivers rescue of minor sisters from the prostitutes)
या महिला त्या दोघींना घेऊन जात असल्याचे चौकातील स्टॉपवर दक्ष असलेल्या रिक्षाचालकांनी पाहिले आणि पुढाकार घेऊन त्या अल्पवयीन मुलींची वेश्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे कोल्हापूरच्या रिक्षाचालकांच्या माध्यमाने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले आहे. अन्यथा या दोन्ही मुली वेश्या व्यवसायाच्या नरकात ढकलल्या गेल्या असत्या.
आई-वडिलांच्या जाचाला कंटाळून या दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडले आणि त्या इचलकरंजीतून पळून एस.टी. बसने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकात आल्या. रात्रीची वेळ असल्याने त्या भांबावल्या होत्या. त्या स्टॅण्ड चौकातील रिक्षात बसल्या. त्या सांगतील त्या विविध ठिकाणी रिक्षाचालकाने त्यांना फिरवले. पण, कोठे जायचे हे निश्चित नसल्याने रिक्षाचालकाने त्यांना पुन्हा आणून मध्यवर्ती बस स्थानक चौकात सोडले. त्यावेळी रिक्षाचालकाने त्यांची आत्मीयतेने विचारपूस केली असता त्यांनी घरातून पळून आल्याचे सांगितले.
...अन् वेश्यांच्या तावडीतून मुलींची सुटका झाली -यानंतर या मुली परिख पुलाकडे जात होत्या. परिसरातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी त्यांना बघितले. त्यांना आपल्याकडे बोलावून भूलथापा देऊन दाभोळकर चौकाच्या दिशेने घेऊन गेल्या. ही बाब स्टॅण्डवरील रिक्षाचालकांच्या लक्षात आली, संबंधित महिला त्या मुलींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करतील या भीतीने रिक्षाचालकांनी संघटितपणे पुढे होऊन त्या महिलांना अडविले आणि त्यांच्या तावडीतून मुलींची सुटका केली व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधित मुलींना बालसुधारगृहात पाठविले आहे.
रिक्षाचालकांचे कौतुक -रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या तावडीतून सोडवून आणणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानक चौकातील रिक्षा स्टॉपवरील भागवत घोडके, चंद्रकांत भोसले, अमोल देवकुळे, निखिल पोवार, सादीक मुलाणी, मेहबुब ताशेवाले आदी रिक्षाचालकांचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी कौतुक केले आहे.