सरदार चौगुले/संजय कळके
पोर्ले तर्फ ठाणे/पोहाळे तर्फ आळते : एकविसाव्या शतकात विज्ञानयुगाच्या कितीही गप्पा मारल्या तरी भूतांखेतांच्या भीतीने अनेकांची गाळणं होती.स्मशानभूमी, पडकी घरे, निर्जन जागी अंधाऱ्यारात्री भूतांचा वावर असतो. यावरती अनेकांचा विश्वास आहे. अज्ञानातून निर्माण झालेली भूता-खेतांसह अंधश्रध्देची भीती मुलांच्या मनातून निघून जाण्यासाठी पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथे अंनिस गेल्या पाच वर्षापासून शोध भुतांचा हा उपक्रम राबवत आहे. मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी अंनिस गेले कित्येक वर्ष प्रयत्न करत आहे.अमावस्या, पोर्णिमा किंवा काळोख्या रात्री अज्ञानपणातून मुलांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रध्देचे भूत बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीचे मिलिंद यादव आणि पन्हाळा तालुका अंनिस उपाध्यक्ष सर्पमित्र दिनकर चौगुले गेले कित्येक वर्ष प्रबोधनात्मक जनजागृती करत आहेत.हा उपक्रम शनिवारी अमावस्येच्या दिवशी सांयकाळी ७ वाजता सुरु झाला आणि रात्री दिड पर्यंत चालला. अमावस्येच्या रात्री पोहाळे येथील स्मशानभूमीत भूताखेतांच्या गोष्टी ऐकवून दिनकर चौगुले यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले.
शोध भुताचा, बोध मनाचा या उपक्रमामुळे मुलांना कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता गैरसमजूत्या आहारी गेलो तर भूतासारख्या अंधश्रद्धा आपल्या मनात पक्क्या होत जातात, हे शिकायला मिळाले. या उपक्रमासाठी पन्हाळा तालुका अंनिसचे कार्याध्यक्ष व नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक, बालसाहित्यिक चंदकांत निकाडे यांचे सहकार्य झाले .
या अनोख्या उपक्रमात चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीचे कार्यकर्ते, शिवाजी मराठा हायस्कूल, कोल्हापूर, जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा नवनाथ हायस्कूल येथील ७० विदयार्थी व विदयार्थीनी तसेच सरपंच दादासाहेब तावडे, सामाजिक कार्यकर्ते बळीराम मिसाळ, श्रीकांत पाटील, प्रकाश ठाणेकर, दतात्रय पाटील आदी सहभागी झाले होते.
मुलांची पाचावर धारण आणि अंधश्रध्देचे भूतस्मशानात झोपी जाण्याच्या स्थिती मुले असताना, स्मशानभूमीतून चाळ,घुंगरांचा आवाज कानावर पडत असताना एक स्त्री भींतीवर चालताना दिसली. सर्वजण भितीच्या छायेत असताना डोक्यावरचं झाड हालू लागले. सुमित नावाच्या मुलाने त्या चेटकीनीला फटकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती त्याच्या अंगावर धावून गेल्यावर हे दृष्य पाहणाऱ्या मुलांची पाचावर धारण बसली. काही न कळण्यापूर्वी सर्वजण घाबरून गाडीत जाऊन बसले. काही क्षणातच सर्वांना समजले की समोर आलेलं भूत नसून अंगाभोवती साडी नेसलेला पोहाळेचा सुनिल पाटील तरूण आहे. याची खात्री झाल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला.