कोल्हापूर : येथील कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसह अन्य विकासकामांबाबत दिल्ली येथील नागरी विमान उड्डाण संचालनालयामध्ये ( डीजीसीए ) मंगळवारी बैठक झाली. त्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून काही बाबींची पूर्तता होणे बाकी असल्याचे डीजीसीएचे अध्यक्ष अरुणकुमार यांच्याकडून सांगण्यात आले. त्याबाबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
‘डीजीसीए’मधील बैठकीस खासदार संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. डीजीसीएचे अध्यक्ष अरुणकुमार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विमानतळावरील सुविधांकरिता भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून काही बाबींची पूर्तता होणे अद्याप बाकी असल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाला राज्य शासनाकडून लागणारी आवश्यक ती मदत केली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. डीजीसीए आणि प्राधिकरणाने संयुक्तपणे प्रयत्न करून कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसह अन्य आवश्यक सुविधांची लवकर पूर्तता करावी, अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केली. त्यावर प्राधिकरणाकडून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकर करण्यासाठी डीजीसीएचे प्रतिनिधी आणि विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल यांच्यासमवेत बुधवारी संयुक्त बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक उपस्थित राहणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
चौकट
३१ मार्चपर्यंत पूर्तता करण्याचे नियोजन
धावपट्टी, ऑबस्टॅकल लाईट आदींची पूर्तता दि. ३१ मार्चपर्यंत करण्याचे आम्ही नियोजन केले असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाकडून काही बाबींची पूर्तता, मदत होणे आवश्यक आहे. त्यासह नाईट लँडिंगबाबतची चर्चा या संयुक्त बैठकीत केली जाणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.